नागपूर : दुचाकीने डबलसीट जात असताना भरधाव ट्रकने वळण घेत दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. एकाच्या अंगावरुन ट्रकचे चाक गेल्यामुळे रस्त्यावरच तो जागीच ठार झाला. दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रमेश कारुलालजी कटरे (४७,काचीमेट, वाडी) आणि धनराज कालीचरण दरवरकर (३०, रा. छुटका,जि. शिवनी-मध्यप्रदेश) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. वाडी पोलीस नेहमीप्रमाणे  वेळेवर पोहचले नाही. त्यामुळे या अपघातानंतर घटनास्थळावर तणाव निर्माण झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश कटरे हे बांधकाम व्यवसायिक आहेत. ते सोमवारी रात्री दुचाकीने  वडधामन्यातील कंपनीत गेले होते. काम संपल्यानंतर ते घराकडे निघाले. दरम्यान, कंपनीतील कामगार धनराज दरवरकर याने दुचाकीने घरापर्यंत सोडून देण्याची विनंती केली. रमेश यांनी धनराज याला दुचाकीवर बसवले आणि घराकडे निघाले. आठवा मैल चौक ते नवनीतनगर टर्निंग पॉईंटवर रमेश यांनी दुचाकीची गती कमी  केली. मात्र, यादरम्यान मागून भरधाव आलेल्या ट्रकने रमेश यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीचालक रमेश आणि धनराज हे दोघेही रस्त्यावर फेकल्या गेले. 

याच ट्रकचे चाक रमेश यांच्या अंगावरुन गेले. त्यामुळे रमेश यांचा रस्त्यावरच चेंदामेंदा झाला.  दुभाजकाजवळ फेकल्या गेलेल्या धनराज यांच्या डोक्याला आणि छातीला जबर मार लागला.  जवळपास अर्धातास अपघातग्रस्तांना मदत मिळाली नाही. त्यामुळे धनराज रक्ताच्या थारोळ्यात पडून होता.  एका दुचाकीचालकाला हा अपघात दिसला. त्याने वाडी पोलिसांना फोन करुन माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक काळींगे हे  पथकासह पोहचले. त्यांनी रुग्णवाहिका बोलावून गंभीर जखमीला मेयो रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी वाडी पोलिसांनी मनिष दिनेश शरणागत (दाभा) यांच्या तक्रारीवरुन ट्रकचालक सुनील उदयसींह कुंभरे (४०, मनसर, ता. रामटेक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याला अटक करुन न्यायालयात दाखल केले.

वाडी पोलिसांमुळे गेला जीव

अपघात झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक काळिंगे यांनी घटनास्थळावर पोहचण्यासाठी बराच उशीर केला. त्यामुळे गंभीर जखमी धनराज यांचा मृत्यू झाला, अशी चर्चा आहे. अपघात झाल्यानंतर घटनास्थळावर  तणाव निर्माण झाला होता. पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात अपयश आले. या प्रकरणी ठाणेदार राजेश तटकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.