लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाचा स्वच्छ कारभार आणि पारदर्शक प्रक्रिया असल्याचा दावा संबंधित मंत्री नेहमी करतात. मात्र, कंत्राटदारांकडून लाखो रुपयांची लाच घेतल्याशिवाय कोणतेही काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणातील अधिकारी करीत नसल्याचे समोर आले. केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाने (सीबीआय) सरव्यवस्थापक अरविंद काळे याला २० लाखांची लाच घेताना अटक केली. सीबीआयने काळे याच्या घरात झाडाझडती घेत एकूण ४५ लाख रुपये जप्त केले आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला वेगवान काम आणि पारदर्शक कारभारासाठी ओळखल्या जाते. मात्र, हा सर्व काही देखावा असून प्राधिकरणाच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यापासून ते वर्ग एकच्या अधिकाऱ्यांपर्यंत लाच पोहचल्याशिवाय काम होत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. एका खासगी कंपनीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कामाचे कंत्राट दिले होते. खासगी कंपनीने वेळेवर काम पूर्ण केले. त्यासाठी वेळोवेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि प्रकल्प व्यवस्थापक अरविंद काळे यांच्याकडे बिलही मंजुरीसाठी सादर केले.

आणखी वाचा-खासदार हेमा मालीनी म्हणतात, ‘मथुरेत कृष्ण मंदिर लवकरच साकार होणार’

प्राधिकरणाने कंपनीचे बिल जमा करून घेतले. कंपनीने उर्वरित काम पूर्ण केले आणि बिलाची रक्कम मंजूर करण्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सरव्यवस्थापक अरविंद काळे यांची भेट घेतली. त्यांनी लवकरच बील मंजूर करून पैसे खात्यात टाकण्याचे आश्वासन दिले. गेल्या दोन महिन्यांपासून बिल मंजूर होत नसल्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्याने काळे यांची पुन्हा भेट घेतली आणि बिल मंजूर करण्याबाबत विचारणा केली. अरविंद काळे यांनी प्रकल्पाची रक्कम मिळवून देण्यासाठी कार्यालयातील ११ कनिष्ठ अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागेल. अन्यथा बील मंजूर करणार नसल्याचे स्पष्ट सांगितले. अरविंद काळे यांनी २० लाख रुपयांची मागणी कंत्राटदार कंपनीकडे केली. त्यांनी लाच देण्यास नकार दिला. त्यामुळे काळे यांनी बिल रोखून धरले. शेवटी नाईलाजास्तव कंत्राटदार कंपनीने सीबीआयकडे लेखी तक्रार केली. सीबीआयने तक्रारीची शहानिशा केली.

आणखी वाचा-…तर महाराष्ट्रात वंचित विरूद्ध भाजप अशीच लढत, ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

रविवारी दुपारी सीबीआयने सापळा रचला. कंत्राटदाराने २० लाख रुपयांची लाच देण्याची तयारी दर्शविली. सरव्यवस्थापक अरविंद काळे यांनी २० लाख रुपयांची लाच स्वीकारताच सीबीआयने त्यांना अटक केली. ती लाच तब्बल ११ अधिकाऱ्यांपर्यंत पोहचणार होती. त्यामुळे सीबीआयने ११ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून काळे यांना अटक केली. काळे यांच्या घरझडतीत २५ लाख रुपयांची रक्कम आढळली. अशाप्रकारे सीबीआयने ४५ लाख रुपयांची रक्कम जप्त केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20 lakhs bribe general manager of national highways authority is arrested adk 83 mrj
Show comments