चंद्रपूर : भद्रावती जवळ ‘जुरासिक’ ते ‘पर्मियन’ या २८ ते १९.५ कोटी वर्षादरम्यानच्या काळातील ‘ग्लासोप्टेरिस’ (Glassopteris) या प्रजातीच्या वनस्पती पानांची सुंदर जिवाष्मे मिळाल्याचा दावा येथील पर्यावरण आणि जीवाष्म संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांनी केला आहे.
यापूर्वी त्यांनी डायनोसॉर, हत्ती, स्ट्रोमॅटोलाईट,शंख शिंपले, वृक्ष आणि पानांचे जिवाष्मे चंद्रपुर जिल्ह्यात अनेक ठिकाणी शोधून काढली असून त्यांच्या वयक्तिगत संग्रहालयात ती सर्व ठेवलेली आहेत. भद्रावती ते चंदनखेडा मार्गावर शेती आणि जंगलात काही ठिकाणी ही अतिप्राचीन पुरावे सापडली आहेत.भद्रावती आणि वरोरा परिसरात त्यांनी डायनोसॉरची जिवाष्मे शोधून काढली होती. आता ह्या त्याहीपेक्षा जुन्या २० कोटी वर्षे जुन्या ‘जुरासिक’ काळातील जिवाष्मे आढळल्यामुळें नवीन इतिहासाला उजाळा मिळाला आहे.
हेही वाचा >>> लष्करी अधिकाऱ्यांच्या रँकचा उल्लेख करताना ‘ही’ काळजी घ्या; राष्ट्रपतींच्या सचिवालयाच्या सूचना काय? वाचा सविस्तर..
या परिसरात जिवाष्मे असल्याची भूशास्त्र विभागाची नोंद होती. परंतू चांगली जिवाष्मे मिळाली नव्हती. गेल्या काही वर्षापासून चोपणे हे या परिसरात संशोधन कार्य करीत आहेत. चंद्रपुर जिल्हा हा भूशास्त्रीय दृष्ट्या एक संग्रहालय असून येथे ३०० ते ६ कोटी वर्षे जुने बहुतेक प्रकारची खडक आढळतात, तर २५ कोटी ते २५ हजार वर्षे प्राचीन जिवाष्मे आढळतात. २० कोटी वर्षादरम्यान जेव्हा हे वृक्ष जिवंत होती आणि विशाल डायनोसॉर जिवंत होते तेव्हा पृथ्वीवर ‘पांजिया’ नावाचा एकच खंड होता आणि भारत हा भूप्रदेश आजच्या आस्ट्रेलियाला लागून होता. प्राचीन भारताच्या आणि चीनच्या मध्ये ‘टेथीस’ नावाचा समुद्र होता. पुढे कोट्यवधी वर्षाने भारताचा भूखंड उत्तरेला सरकत गेला आणि चीनच्या भूखंडाला टककर दिली. ह्यातून हिमालय निर्माण झाला. अजूनही भूकवचाची ही गती उत्तरेकडे सरकत आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील भूगर्भात अजून असे अनेक रहस्य दडलेली असून भूशास्त्र विभागाने आणि संशोधकानी सविस्तर संशोधन केल्यास भविष्यात ती दृष्टीपटात येतील, असे चोपणे यांनी सांगितले.