नागपूर: जिल्ह्यात करोनाचे निदान झालेल्या २० रुग्णांमध्ये ‘जेएन १’ हा विषाणूचा उपप्रकार आढळला. त्यापैकी सर्वाधिक १८ रुग्ण हे शहरातील आहेत. उपराजधानीत प्रथमच या उपप्रकाराचे रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात आढळलेल्या एकूण २० रुग्णांपैकी १० रुग्ण हे जेएन १ आणि १० रुग्ण हे जेएन १.१ या उपप्रकाराचे आहेत. २० पैकी १२ रुग्ण करोनामुक्त झाले असून ८ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. या आठही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
हेही वाचा… मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज पावसाचा अंदाज
दरम्यान, शुक्रवारी २४ तासांत शहरात ३ नवीन करोनाग्रस्त आढळले. दिवसभरात शहरात ११ आणि ग्रामीणला १ असे एकूण १२ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे शुक्रवारी शहरात ४२ आणि ग्रामीणला ११ असे एकूण ५२ सक्रिय करोनाग्रस्त नोंदवले गेले. यापैकी एकही रुग्ण रुग्णालयात दाखल नाही. जेएन १ या उपप्रकाराचे २० रुग्ण जिल्ह्यात आढळल्याच्या वृत्ताला आरोग्य विभागाने दुजोरा दिला आहे.