अकोला : यंदा मोसमी पाऊस लांबणीवर पडल्याने खरीप हंगामातील पेरणीला दिरंगाई झाली आहे. त्यामुळे आपत्कालीन पीक नियोजन करण्यासाठी डॉ. पंजाबरावर देशमुख कृषी विद्यापीठाने कपाशी, ज्वारी आणि सोयाबीनच्या पेरणीसंदर्भात शिफारशी जाहीर केल्या आहेत. त्यानुसार कपाशी व ज्वारीचे २० टक्के जादा बियाणे वापरावे लागणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरीप हंगामाच्या सुरुवातीला मोसमी पाऊस चांगलाच लांबणीवर पडल्याने पेरणीचे मोठे क्षेत्र खोळंबले होते. जिल्ह्यात पावसाचे आगमन उशिराने झाल्याने खरीप हंगामातील पीक पेरणी विलंबाने होत आहे. जिल्ह्यात एकूण चार लाख ६९ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरणीचे नियोजन आहे. जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनचे दोन लाख ३२ हजार हेक्टर, कापूस एक लाख ६० हजार हेक्टर, तूर ५७ हजार ५०० हेक्टर, मूग १० हजार, उडीद सहा हजार, खरीप ज्वारी तीन हजार हेक्टरवर पेरणी होणे अपेक्षित आहे. जून महिन्यात मोसमी पावसाने हुलकावणी दिली. जुलै महिन्याचा पहिला आठवडादेखील पावसाविना गेला. त्यामुळे बळीराजा चिंतेत सापडला होता. अखेर जिल्ह्यावर वरुणराजाने कृपादृष्टी दाखवली. गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यात दमदार पावसाचे आगमन झाले. पेरणी योग्य पाऊस झाल्याने आता जिल्ह्यात पेरणीला वेग आला.

हेही वाचा – जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप टाले ‘नॉट रिचेबल’.. पद वाचविण्यासाठी भाजपला शरण?

यंदा पेरणीला विलंब झाल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कापूस, ज्वारी व सोयाबीन पिकासंदर्भात शिफारशी जाहीर केल्या आहेत. अमेरिकन तसेच देशी कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावेत. साधारण: २० टक्के जादा बियाणे वापरावी, सुधारीत व संकरीत वाणाच्या बाबतीत दोन झाडांमधील अंतर कमी करावे, मूग, उडीद, सोयाबीन पिकांवर आंतरपीक म्हणून आंतरभाव करावा. कापूस, ज्वारी:तूर:ज्वारी या त्रिस्तरीय आंतरपीक पद्धतीचा (6:1:2:1) अवलंब करावा. संकरीत ज्वारीचा सी. एस.एच.-९ किंवा सी.एस.एच. -१४ वाण वापरावा. बियाणाचा दर २० ते २५ टक्के वाढून पेरणी करावी. सोयाबीन टी.ए.एम.एस.३८, टी.ए.एम.एस.९८, ३१ किंवा जे.एस. ३३५ या पैकी उपलब्ध वाण वापरावे. सोयाबीनच्या दोन, सहा किंवा नऊ ओळी नंतर म्हणजेच तुरीची एक ओळ पेरावी. मूग, उडीद, तूर नेहमीप्रमाणे पेरणी करावी, असा सल्ला कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिला आहे.

जिल्ह्यात ६३ टक्के पेरण्या पूर्ण

अकोला जिल्ह्यात आतापर्यंत ६३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. दोन लाख ८७ हजार ६६१ हेक्टरवर पेरण्या आटोपल्या आहेत. सर्वाधिक एक लाख ६१ हजार ४३८ हेक्टरवर सोयाबीन, त्याखालोखाल कपाशी ८९ हजार ५६३ हेक्टरवर पेरणी झाली.

हेही वाचा – चंद्रपूर : नक्षलवादी ठपका पुसण्यासाठी अरुण भेलकेंची धडपड, विद्यार्थ्यांना इंग्रजीचे देतोय धडे

यंदा पाऊस उशिरा आल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. आता समाधानकारक पाऊस झाल्याने पेरण्यांना वेग आला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पिकांचे नियोजन करावे. – शंकर किरवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20 per cent extra seed of cotton and jowar will have to be used as a result of delayed sowing due to prolonged rains ppd 88 ssb
Show comments