अमरावती: कर्तव्यावर असताना सतर्कता बाळगून अनुचित घटना टाळणाऱ्या मध्य रेल्वेच्या २० रेल्वे कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यात भुसावळ विभागातील मिलिंद भालेराव, अमोल अशोक, अजय निकम, के.एन. सिंग, अशोककुमार मिश्रा, मो. खुर्शिद आलम आणि अभिमन्यू मौर्य यांचा समावेश आहे.
जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यातील कामगिरीसाठी हे पुरस्कार देण्यात आले आहेत. या पुरस्कारामध्ये पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय सुरक्षा कार्याचे प्रशस्तिपत्रक आणि २ हजार रुपये रोख पुरस्काराचा समावेश आहे. भुसावळ विभागातील कर्मचारी मिलिंद भालेराव यांना रेल्वे रुळाला तडा गेल्याचे निदर्शनास येताच त्यांनी लगेच लोको पायलटला सुचित केले. रेल्वे मार्गाची देखभाल करणारे अमोल अशोक यांना मुसळधार पाऊस सुरू असताना गर्डर पुलाजवळ धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त पाणी असल्याचे आढळले. त्यांनी ताबडतोब त्यांच्या वरिष्ठांना कळवले आणि सेक्शनवरील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली.
अजय निकम यांना मुर्तिजापूर-माना दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचलेले आढळले. रुळाखालील माती वाहून गेल्याचे लक्षात येताच त्यांनी ताबडतोब मार्गावरून धावणारी रेल्वेगाडी लाल झेंडी दाखवून थांबवली. संबंधित अधिकाऱ्यांना कळवण्यात आल्याने विभागातील अप आणि डाऊन बाजूची वाहतूक बंद करण्यात आली. त्यांनी तातडीने केलेल्या हालचालींमुळे मोठा अनर्थ टळला.
लोको पायलट के. एन. सिंग हे कर्तव्यावर असताना डाऊन मार्गावर एक सैल फिश प्लेट दिसली. त्यांनी लगेच ट्रेन थांबवली आणि पुढच्या स्टेशनच्या स्टेशन मास्तरांना इशारा दिला. लोको पायलट अशोक कुमार मिश्रा यांना भुसावळ-बडनेरा दरम्यान काही लोक एका ठिकाणी रेल्वेला थांबण्यासाठी इशारा करीत असल्याचे दिसले. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे पुढच्या रुळाखालील माती वाहून गेली होती. रेल्वेगाडीचा वेग १०० किमी प्रतितास होता, पण त्यांनी लगेच इमर्जन्सी ब्रेक लावले. मोठी दुर्घटना टळली.
हेही वाचा… भाजी विक्रेत्याने बाजारातून चोरल्या तब्बल ३१ दुचाकी! मध्यप्रदेशात कवडीमोल भावाने विक्री
लोको पायलट मो. खुर्शीद आलम कर्तव्यावर असताना इगतपुरी रेल्वे क्रॉसिंगवर टेम्पो उभा असलेला दिसला. त्यांनी येणाऱ्या रेल्वेगाडीच्या लोको पायलटला इशारा दिला आणि मोठी दुर्घटना टळली. सहायक लोको पायलट अभिमन्यू मौर्य यांना रेल्वे इंजिनची तपासणी करताना एक भेगा पडलेला हेलिकल स्प्रिंग दिसला. तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना कळवण्यात आले आणि संभाव्य अनर्थ टळला.