गोंदिया : गेल्या दोन महिन्यांपासून हावडा-मुंबई मार्गावरील पॅसेंजर गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले असून त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ही समस्या अशीच राहणार असल्याचे रेल्वे विभागाचे म्हणणे आहे. याचे कारणही रेल्वे विभागाने दिले आहे.
गुरुवारपासून अनेक गाड्यांची चाके थांबणार आहेत. खरे तर, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे रायपूर रेल्वे विभागाच्या रायपूर-रायपूर आरव्ही ब्लॉक हट दरम्यान दुसरा रेल्वे मार्ग आणि रायपूर यार्डच्या आधुनिकीकरणाचे काम ४ ते १० मे दरम्यान प्रस्तावित आहे.
हेही वाचा – नागपूर : नापास झाल्यामुळे नैराश्य; अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीने संपविले जीवन
यासाठी २० गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर ६५ गाड्या वळवलेल्या मार्गांवर चालवण्यात येणार आहेत. देशातील विविध ऊर्जा प्रकल्पांमध्ये कोळशाचा पुरेसा साठा नाही. ज्याचा वीज निर्मितीवर परिणाम होत आहे. त्यासाठी मालगाड्यांद्वारे वीज केंद्रांपर्यंत कोळसा पोहोचवण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी प्राधान्याने मालगाड्या सोडण्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
वीज प्रकल्पातील कोळशाचा साठा पावसापूर्वी पूर्ण न झाल्यास भविष्यात देशात वीज संकट निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्रवासी गाड्यांऐवजी मालगाड्यांना प्राधान्य दिले जात आहे. तसेच हावडा-मुंबई मार्गावरील नागपूर ते डोंगरगड दरम्यानच्या तिसऱ्या मार्गाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे गेल्या दोन-तीन महिन्यांपासून गाड्या उशिराने धावत आहेत.
हावडा-मुंबई मार्गावरील नागपूर ते डोंगरगड दरम्यान सर्व एक्स्प्रेस आणि मेल गाड्यांची वेळ विस्कळीत झाली आहे. गाड्या तीन ते चार तास उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांचेही हाल होत आहेत. नियोजित ठिकाणी पोहोचण्यास उशीर होण्याबरोबरच आर्थिक नुकसानही होत आहे. ही समस्या डिसेंबर २०२३ पर्यंत कायम राहणार असल्याचे खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले.
हेही वाचा – लोकजागर : शोषणाचा ‘खाणमार्ग’!
नागपूरहून गोंदियाकडे येणारी रेलगाडी ढाकणी रेल्वे चौकीजवळ आणि डोंगरगडहून गोंदियाकडे येणारी गुदमा स्टेशनजवळ दीड ते दोन तास उभी केली जात आहे. परिणामी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वेळेवर न पोहोचल्याने प्रवाशांना त्यांची दुसरी जोड ट्रेन ही पकडता येत नाही. गेल्या तीन-चार महिन्यांपासून ही समस्या कायम असून पुढील सहा महिने ही समस्या कायम राहणार असल्याचे संकेत रेल्वे विभागाने दिले आहेत.
रद्द केलेल्या गाड्या
बिलासपूर-रायपूर मेमू स्पेशल, रायपूर-डोंगरगड मेमू स्पेशल, दुर्ग-रायपूर मेमू स्पेशल, रायपूर-दुर्ग मेमू स्पेशल, दुर्ग-रायपूर मेमू स्पेशल, डोंगरगड-रायपूर मेमू स्पेशल, रायपूर-दुर्ग-रायपूर मेमू स्पेशल, बिलासपूर-रायपूर आणि रायपूर-डोंगरगड मेमू स्पेशल, गोंदिया-रायपूर मेमू स्पेशल, बिलासपूर-रायपूर मेमू स्पेशल, टिटलागड-रायपूर मेमू स्पेशल, रायपूर-टिटलागड मेमू स्पेशल, विशाखापट्टणम-दुर्ग एक्सप्रेस, दुर्ग-विशाखापट्टणम एक्सप्रेस, रायपूर-जुनागड रोड पॅसेंजर स्पेशल जुनागड रोड-रायपूर पॅसेंजर स्पेशल या गाड्यांना ४ मे ते १० मे पर्यंत रद्द करण्यात आले आहे.