नागपूर : जिल्ह्यात स्वाईन फ्लू हा आजार गंभीर वळणावर पोहोचला आहे. सध्या येथे १० स्वाईन फ्लूग्रस्तांच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब झाले. या आजाराने आणखी २० मृत्यू झाल्याचे पुढे येत आहे. ३० ऑगस्टला होणाऱ्या मृत्यू विश्लेषण समितीच्या बैठकीत त्यातील किती रुग्णांच्या मृत्यूला केवळ स्वाईन फ्लू कारणीभूत आहे, हे स्पष्ट होईल.

नागपुरातील शहरी भागात १ जानेवारी २०२२ ते २५ ऑगस्ट २०२२ पर्यंत १९१, शहराबाहेरील (नागपूर ग्रामीण आणि जिल्ह्याबाहेरील) १५५ असे एकूण ३४६ रुग्ण आढळले. त्यातील बहुतांश रुग्ण हे गेल्या दोन ते तीन महिन्यातील आहेत. एकूण रुग्णांपैकी शहरातील ११६ आणि ग्रामीणचे ७५ असे १९१ जण बरे होऊन घरी परतले. मृत्यू विश्लेषण समितीनुसार, शहरात ६, ग्रामीणला १ आणि जिल्ह्याबाहेरील ३ असे एकूण १० जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला.

समितीच्या याआधीच्या बैठकीत मेडिकलच्या अधिकाऱ्यांनी काही कागदपत्रे आणली नसल्याने १६ मृत्यूंच्या कारणांवर चर्चा झाली नाही. त्यानंतर नक्षलवादी पांडू नरोटे याच्यासह इतरही चार ते पाच मृत्यू झाले. या मृत्यूंवर चर्चा करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने आरोग्य उपसंचालक कार्यालयाशी समन्वय साधून ३० ऑगस्टला समितीची बैठक ठेवली आहे. या बैठकीत सुमारे २० मृत्यूंच्या कारणांवर चर्चा करून त्यातील केवळ स्वाईन फ्लूने दगावणाऱ्यांची नोंद या गटात होईल.

रुग्ण आणि मृत्यूचे वाढते प्रमाण चिंताजनक

२४ रुग्ण जीवनरक्षण प्रणालीवर नागपूर महापालिका हद्दीतील ५८ आणि ग्रामीणचे ६४ असे एकूण १२२ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यातील २४ रुग्ण जीवनरक्षण प्रणालीवर आहेत.