यवतमाळ : ग्रामीण भागातील कष्टकरी महिलांना स्वप्नवत वाटणारी मुंबई प्रत्यक्षात बघायला मिळाली आणि ‘जीवाची मुंबई’ करून या महिला भारावल्या. कालपर्यंत जे केवळ टीव्हीवर बघितले ती सर्व अनुभूती घेताना महिलांच्या आनंदास पारावार उरला नाही.विमान प्रवास, मुख्यमंत्र्यांची भेट, ताज हॉटेलमध्ये चहापान आणि मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून मिळालेली साडी चोळी, अभिनेता अशोक सराफ यांच्यासोबत भेट व वृत्त वाहिनीचे कामकाज पाहण्याची संधी… या महिला हे सर्व अनुभव आयुष्यात प्रथमच घेत होत्या.
घाटंजी येथील धुणी भांडी काम करणाऱ्या २० महिलांना रसिकाश्रय या संस्थेने ‘जीवाची मुंबई, श्रमाची आनंदवारी’, या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घडविली. चार घरची धुणी भांडी करताना आपण कधीतरी मुख्यमंत्र्यांना भेटू, असा विचार स्वप्नातही केला नव्हता. आपर्यंत मुख्यमंत्र्यांना टिव्हीवरच बघितले होते. मात्र आज मुख्यमंत्र्यांसोबत बसून बोलत आहो. ही भेट स्वप्नवत वाटत आहे, अशी प्रतिक्रिया देत काही महिलांनी थेट अश्रूंना वाट मोकळी करून दिली. भांडे घासून मिळणाऱ्या ५०० रुपयांत कुटुंब कसं चालवायचं, हा प्रश्न नेहमीच त्रस्त करत होता. मात्र ‘लाडकी बहीण’ योजनेने मोठा आधार दिला, असे एका वृद्ध महिलेने यावेळी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी या महिलांशी संवाद साधत लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, तर, यापेक्षाही अधिक मदत कशी करता येईल, याचा विचार शासन करत असल्याचे यावेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा आणि मुंबईच्या सफरीचा या अनुभव जीवनभर लक्षात राहणारा आहे. आम्ही कधी विमान पाहिलं नव्हतं, पण सामाजिक कार्यकर्ते महेश पवार यांच्यामुळे विमानातून प्रवास करण्याची संधी मिळाली. हे सर्व स्वर्गीय अनुभव असल्याचे यावेळी एका महिलेने मुख्यमंत्र्यांना सांगितले.
सन्माननिधी म्हणून मिळणारे १० हजार रुपये दरवर्षी मिळावेत, अशी विनंती यावेळी काही महिलांनी मुख्यमंत्र्यांना केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत, शासन पातळीवर या मागणीचा विचार करू, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी महिलांना सांगितले. काही वृद्ध महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नसल्याने त्यांना निराधार योजनेंतर्गत मदत देण्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. या महिलांच्या संघर्षाची जाणीव करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी रसिकाश्रय संस्थेचे अभिनंदन केले. या भेटीनंतर महिलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.
ताज हॉटेलमध्ये चहा, अशोक सराफ यांची भेट
घाटंजी येथे धुणी- भांडी करणाऱ्या या महिला कामगारांसाठी विमानवारी एक दिव्य स्वप्न होतं. या महिलांनी जीवाची मुंबई करत दोन दिवस मुंबई डोळ्यांत साठवून घेतली. सोबतच पद्मश्री अशोक सराफ, मराठी अभिनेते भारत गणेशपुरे यांची भेट घेतली. ताज हॉटेलमध्ये चहापाणी घेतले. महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या महिलांचा साडीचोळी देऊन केलेला सन्मान अपेक्षेपलिकडे होत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी केवळ अवर्णनीय होता, असे रसिकाश्रय संस्थेचे महेश पवार यांनी सांगितले.