अमरावती : एका बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक २) ए. एस. काझी यांच्या न्यायालयाने मंगळवारी २० वर्षे सश्रम कारावास, २० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना ४ फेब्रुवारी २०२१ रोजी तिवसा ठाण्याच्या हद्दीतील घडली होती.
विठ्ठल रामजी कामठे (३५) रा. तारखेडा, तिवसा असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयात दाखल दोषारोपपत्रानुसार, विठ्ठल हा पीडित १२ वर्षीय बालिकेच्या वडिलांचा मित्र असल्याने त्याचे त्यांच्याकडे येणे-जाणे होते. घटनेच्या दिवशी ४ फेब्रुवारी २०२१ रोजी विठ्ठल हा दुचाकीने त्यांच्याकडे आला. त्याने पीडित बालिकेला आवाज देऊन आपल्यासोबत बाहेर नेले. मात्र, त्याने रात्रभर पीडित मुलीला घरी न आणल्यामुळे दुसऱ्या दिवशी ५ फेब्रुवारी २०२१ रोजी तिच्या आईने तिवसा ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी विठ्ठलने पीडित बालिकेला तिच्या घराजवळ आणून सोडून दिले. पीडित बालिका घरी परतल्यावर तिची चौकशी करण्यात आली. विठ्ठल हा आपल्याला एका शेतात घेऊन गेला. तेथे त्याने आपल्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यापूर्वीही त्याने आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचे पीडित बालिकेने यावेळी सांगितले. या प्रकरणी पीडित बालिकेच्या आईने तिवसा ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विठ्ठलविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपासाअंती आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणात न्या. ए. एस. काझी यांच्या न्यायालयात ५ साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता दीपक मा. आंबलकर यांनी यशस्वी युक्तीवाद केला. पैरवी अधिकारी म्हणून वैशाली तिवारी व अरुण हटवार यांनी काम पाहिले.