अमरावती : महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील वीज ग्राहकांनी वीज बिल भरण्यासाठी दिलेल्या धनादेशांपैकी अमरावती परिमंडळात दर महिन्याला सुमारे २०० धनादेश अनादरीत (चेक बाऊंस) होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येक वीज बिलासाठी विलंब आकार अधिक जीएसटी करासह ८८५ रुपयांचा दंड संबंधित ग्राहकाच्या पुढील महिन्याच्या वीज बिलामध्ये इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येतो. धनादेश अनादरीत प्रकरणात या ग्राहकांना दंड सोसावा लागतो.
‘ऑनलाईन’ वीज बिल भरण्याची सोय उपलब्ध असली तरी अद्यापही परिमंडळातील काही वीज ग्राहक दरमहा वीजबिलांचा भरणा धनादेशाद्वारे करीत आहेत. यामध्ये मात्र दरमहा सुमारे २०० ग्राहकांच्या वीजबिलांचे धनादेश न वटता परत येत असल्याचे दिसून येत आहे. अमरावती परिमंडळात नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये ५६७ चेक बाऊंस झालेले आहे. त्यामध्ये अमरावती शहर १५६, ग्रामीण ७७, अचलपूर १२०, मोर्शी ४०, यवतमाळ ८९, पुसद ३१, पांढरकवढा ३१ आणि दारव्हा विभागातील २३ धनादेशांचा समावेश आहे.
अनादरीत झालेल्या एकाच धनादेशाद्वारे अनेक वीजबिलांचा भरणा केलेला असल्यास प्रत्येक वीजबिलासाठी दंडात्मक रक्कम लावण्यात येत आहे. यासोबतच धनादेशाद्वारे वीजबिल भरण्याची सोय सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात येते. धनादेशावर चुकीची तारीख, खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी, चुकीचे नाव, खात्यात पुरेशी रक्कम नसणे आदी कारणांवरून धनादेश अनादरित होत असल्याचे आढळून येत आहे.
धनादेश दिल्यानंतर तो जमा होण्यासाठी साधारणतः तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागतो. धनादेश दिल्यानंतर वीजबिल भरल्याची पावती त्याच दिवशी मिळत असली तरी धनादेशाची रक्कम जमा झाल्याच्या तारखेलाच किंवा चेक जमा केल्यापासून तीसऱ्या दिवशी वीजबिल भरणा ग्राह्य धरला जातो. त्यामुळे मुदतीच्या एक-दोन दिवस आधी दिलेल्या धनादेशाची रक्कम मुदतीनंतर जमा झाल्याने पुढील वीजबिलामध्ये थकबाकी दिसून येते. महावितरणचे www.mahadiscom.in हे संकेतस्थळ तसेच महावितरण मोबाईल अॅपद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ‘ऑनलाईन’ भरणा करणे लघुदाब वीजग्राहकांसाठी घरबसल्या शक्य झाले आहे. एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांबाबत सेवा उपलब्ध आहे. तसेच क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, युपीआय, भीम, इंटरनेट बॅकींग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅकिंगद्वारे भरणा केल्यास वीजबिलामध्ये ०.२५ टक्के (५०० रुपयांच्या मर्यादेत) सूट देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांनी धनादेशाऐवजी वरील विविध ऑनलाईन पर्यायाचा वापर करावा असे आवाहन महावितरणने केले आहे.