लोकसत्ता टीम
गोंदिया : रब्बीतील धानपिकास नियमित आणि बारा तास वीजपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास परिसरातील जवळपास २०० शेतकऱ्यांनी येथील वीज वितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
गोरेगाव तालुक्यातील सोनी, बोटे, दवडीपार, झांजिया, मोहगाव, सर्वाटोला या भागांत ७ एप्रिलपासून धानपिकास पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना रात्री १० वाजतापासून ते पहाटे चार वाजतापर्यंत म्हणजे आठ तास वीजपुरवठा करण्यात येतो. रात्री भारनियमन जास्त असल्यामुळे फेस, डीओ जात राहतो. यामुळे अनेक तास विद्युत पुरवठा बंद असतो. त्यामुळे शेतीला पुरेसे पाणी मिळू शकत नाही. रात्री-बेरात्री शेतात जाणे हे धोकादायक आहे. त्यामुळे एप्रिल, मे महिन्यात दिवसा १२ तास वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केली आहे.
यावेळी पंचायत समिती सदस्य किशोर पारधी, मोहगावचे उपसरपंच कमलेश रहांगडाले, सुनील साखरे, दवडीपारचे सरपंच बुगलाल कटरे, झांजियाचे सरपंच अरुण बिसेन व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारनियमन बंद करून अखंडित वीजपुरवठा करा
देवरी तालुक्यातील चिचगड परिसरातील भारनियमन बंद करून अखंडित वीजपुरवठा करा, अशी मागणी चिचगड व परिसरातील नागरिकांनी केली आहे. याबाबतचे निवेदन देवरी महावितरणचे कार्यकारी अभियंता फुलझेले यांना दिले आहे. चिचगड येथील उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये ४४० केव्हीने विद्युत पुरवठा करण्यात यावा, चिचगड उपकेंद्र येथे १० एमव्हीएचे पॉवर ट्रान्सफार्मर उपलब्ध करून देण्यात यावे, या उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व गावांतील भारनियमन बंद करून नेहमीकरिता अखंडित वीज पुरवठा करण्यात यावा, २०२५ पूर्वी कृषीपंपाकरिता डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना कृषी विद्युत मीटर देण्यात यावे आदींसह अन्य मागण्या निवेदनात नमूद आहेत.
अभियंत्यांना निवेदन देताना शालिकराम गुरनुले, देवविलास भोगारे, यशवंत गुरनुले, गणेश तोफे, महेंद्र निकोडे, राजेश चदिवार, हंसराज ठाकरे यांच्यासह पालांदूर, मगरडोह, टेकरी, रामगड, सुकळी, ढोडरा, रोषा, सिंगनडोह, घोनाडी, बोडे, पळसगाव येथील शेकडो नागरिक उपस्थित होते.
शेतकऱ्यांना १२ तास वीज उपलब्ध करून द्या : खासदार डॉ.प्रशांत पडोळे
गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १२ तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी गोंदिया शासकीय निवासस्थानावर महावितरणचे अधीक्षक अभियंता आणि महावितरणच्या सर्व अधिकाऱ्यांना आदेश दिले. सदर बैठकीला जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, माजी आमदार दिलीप बनसोड, शहर काँग्रेस अॅड. योगेश अग्रवाल बापू आणि इतर जिल्हा काँग्रेस पदाधिकारी प्रमुख उपस्थित होते.
खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी गोंदिया जिल्ह्यातील जनतेच्या वीज विभागाबाबतच्या समस्या ऐकून घेतल्या आणि अधिकाऱ्यांना खडसावून लवकरात लवकर समस्या सोडवण्याचे आदेश दिले.