नागपूर : शहरातील मेडिकलमध्ये तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणाऱ्यांना २०० रुपये दंड आकारणे सुरू झाले आहे. राज्यभऱ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतही लवकरच अशीच कारवाई केली जाणार आहे.
देशात तोंडाचा कॅन्सर आढळणाऱ्या रुग्णांमध्ये नागपूरचा क्रमांक वरचा आहे. या कॅन्सरला तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन व धुम्रपानही एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे शासनाने गुटखा, पानमसालासह सुगंधित तंबाखूवर प्रतिबंध घातला आहे. शासकीय कार्यालय परिसरात हे पदार्थ खाण्यावर बंदी आहे. त्यानंतरही बहुतांश शासकीय रुग्णालयांत नागरिक तंबाखूजन्य पदार्थ खातात. त्यामुळे शासनाने १० जुलै २०२३ रोजी अध्यादेश काढून तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन व धुम्रपान केल्यास २०० रुपये दंड आकारण्याचे ठरवले. त्यानुसार नागपूर मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार यांनी ११ ऑगस्टपासून कारवाई सुरू केली. ११ ऑगस्टला ३५ आणि १२ ऑगस्टला सुमारे १५ नागरिकांवर कारवाई करण्यात आली. या चांगल्या उपक्रमाची दखल घेत वैद्यकीय शिक्षण खात्याने टप्प्याटप्प्याने राज्यभऱ्यात तो राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा – नागपूर : स्पेनच्या तुलनेत भारतात अत्यल्प अवयवदान – प्रा. डॉ. टॉम चेरियन यांची माहिती
“पुण्यात अधिष्ठाता असताना आम्ही तंबाखूजन्य पदार्थ व धुम्रपानाचे साहित्य जप्त करत होतो. आता शासनाच्या निर्णयानुसार नागपुरातील मेडिकलमध्ये ही कारवाई सुरू झाली आहे. लवकरच राज्यभरात या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल.” – डॉ. अजय चंदनवाले, संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग, मुंबई.