नागपूर: राज्यातील २१ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील फिजीओलाॅजी विभागात ‘प्रगत डिजिटल फिजियोलाॅजी प्रयोगशाळा’ उभारण्यात येणार आहे. त्यासाठी २४४ कोटींच्या निधीला शासनाने मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेच्या (एनएमसी) पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या मार्गदर्शक सूचनेत प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयातील फिजियोलाॅजी विभागात प्रगत डिजिटल फिजियोलाॅजी प्रयोगशाळा बंधनकारक करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना रुग्णांचे डिजिटल यंत्राने टिपलेले वेगवेगळे शारीरिक बदल दाखवून मानवी शरीराबाबतची संपूर्ण माहिती दिली जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही प्रयोगशाळा वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा एक भाग आहे. तरीही राज्यातील अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत अशी प्रयोगशाळा नव्हती. एनएमसीने या त्रुटीवर बोट ठेवले होते. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण खात्याने शासनाला याबाबतचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार राज्यातील २१ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्येकी एक अशा पद्धतीने एकूण २१ या प्रयोगशाळा ‘टर्न की’ पद्धतीने उभारण्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे २४४ कोटी १५ लाख ११ हजार ४५० रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

हेही वाचा : उपराजधानीत ड्रग्स तस्करांचा पुन्हा सुळसुळाट, कुरिअरने मागविले…

‘या’ महाविद्यालयांमध्ये होणार प्रयोगशाळा….

बुलढाणा, गडचिरोली, सिंधुदूर्ग, जालना, मिरज, नंदूरबार, रत्नागिरी, परभणी, सातारा, जळगाव, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसह मुंबईतील ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामतीचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळयातील श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातुरचे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळचे श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबेजोगाईचे स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (अंबेजोगाई), पुणेचे बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,सोलापूरचे डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेडचे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ही सुविधा मिळणार आहे.

हेही वाचा : विधानसभेची नांदी, नव्या उमेदवाराला संधी… काँग्रेस दक्षिण नागपूरमध्ये…

“राज्यातील २१ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये ‘प्रगत डिजिटल फिजियोलाॅजी प्रयोगशाळा’ उभारली जाणार आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना मानवी शरीराची अचूक व परिपूर्ण माहिती मिळेल.”

दिनेश वाघमारे, सचिव, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग, मुंबई

हेही वाचा : बुलढाणा: सायबर गुन्हेगाराचे गुजरात कनेक्शन; आरोपी वडनगर…

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत सर्व महाविद्यालय

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाची १ सप्टेंबर १९७१ साली स्थापना करण्यात आली. या विभागाच्या अखत्यारीत राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये येतात. राज्यामध्ये वैद्यकीय दंत परिचारिका व इतर आरोग्य सेवेशी संबंधित अभ्यासक्रमाचे दर्जा वाढ करणे हे या विभागाचे उदिदष्ट आहे. त्याअनुषंगाने राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग भारतीय दंत परिषद भारतीय परिचर्या परिषद महाराष्ट्र परिचयौ परिषद व आरोग्य सेवा विभाग यांनी पारीत केलेले कायदे व त्या अनुषंगिक असलेले निकाषाचा अवलंब केला जातो. सदर कार्यालयांवर प्रशासकीय नियंत्रण ठेवणे यासह विदयार्थी प्रवेश प्रक्रिया पदनिर्मीती हे संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई या कार्यालयाची प्रमुख कार्ये आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 21 medical colleges benefit from digital physiology laboratory at a cost of 244 crores mnb 82 css
Show comments