विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. २७ पैकी पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने २२ उमेदवार रिंगणात असून बहूरंगी लढत होणार आहे. यात भाजप समर्थित शिक्षक परिषदेचे नागो गाणार, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले, आम आदमी पक्षाचे डॉ. देवेंद्र वानखेडे, बहुजन समाज पक्षाच्या निमा रंगारी आदी प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. ३० जानेवारीला मतदान होणार आहे.
हेही वाचा- मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची फरफट; परीक्षेच्या तोंडावर पुस्तकांपासून वंचित
निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी यांच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे कोण अर्ज मागे घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या. तसेच महाविकास आघाडी ऐनवेळेवर आपला उमेदवार बदलणार, अशी चर्चा सुरू होती. त्यात ऐन वेळेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांना अर्ज मागे घेण्याच्या सूचना पक्षाकडून देण्यात आल्या. त्यांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतला. तर महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित सतीश इटकेलवार अर्ज मागे घेणार अशी चर्चा होती. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत ते संपर्काबाहेर होते. त्यांनी अर्ज मागे न घेतल्याने पक्षातून निलंबित करण्यात आले. विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमधून एकूण २७ उमेदवारांनी ४३ नामनिर्देशपत्र दाखल केले होते. यातून पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी २२ उमेदवार निवडणूक लढणार आहेत.
हेही वाचा- नागपूर: सचालकांच्या भ्रमणध्वनी वापराकडे विशेष लक्ष बसचालकांच्या भ्रमणध्वनी वापराकडे विशेष लक्ष
यांनी माघार घेतली
अपक्ष उमेदवार नीळकंठ उईके, अतुल रुईकर, मुकेश पुडके आणि मृत्युंजय सिंह यांनी तसेच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. मृत्युंजय सिंह यांनीही महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. मात्र, शेवटच्या दिवशी माघार घेतली.
हेही वाचा- बुलढाणा : अपघातांची ‘समृद्धी’! शिवणा पिसानजीक भीषण अपघातात तीन ठार; मृतक नागपूरचे असल्याची माहिती
पक्षादेशामुळे माघार
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नऊ हजारांहून अधिक नोंदणी केली होती. अनेक महिन्यांपासून मी स्वत: आणि कार्यकर्तेे निवडणुकीची तयारी करत होते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचा प्रचार झाला आहे. मात्र, पक्षाने आदेश दिल्यामुळे अर्ज मागे घेतला आहे. यामुळे कार्यकर्त्यांचाही हिरमोड झाला. परंतु, पक्षाचा आदेश महत्त्वाचा असल्याने माघार घ्यावी लागली, असे गंगाधर नाकाडे यांनी सांगितले.