लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : नायलॉन मांजाच्या वापरावर प्रतिबंध असला तरी संक्रांतीला अनेक भागात या मांजाचा उपयोग झाला. परिणामी, २२ जखमींना मेडिकल, मेयो रुग्णालयात दाखल करावे लागले.

मेडिकलमध्ये दाखल रुग्णांमध्ये एका ८ वर्षीय मुलाचा समावेश आहे. त्याच्या पायात मांजा अडकला. दुसऱ्या एका १४ वर्षीय मुलाच्या पायाला मांजामुळे मोठी जखम झाली. एका ६१ वर्षीय रुग्णाचे नाक, तर एका ३२ वर्षीय महिलेचा कान कापला. या सगळ्यांना जखमी अवस्थेत मेडिकलला दाखल गेले गेले. त्यापैकी काहींना आवश्यक उपचार करून सुट्टी दिली गेली.

आणखी वाचा-अकोला : ‘फरदड’मुळे कापूस पिकाला गुलाबी बोंडअळीचा धोका

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही एकूण १२ जण मांजामुळे जखमी होऊन उपचाराला आले. या दोन्ही शासकीय रुग्णालयांच्या तुलनेत खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. परंतु या रुग्णांच्या नोंदी होत नसल्याने ही आकडेवारी महापालिका प्रशासनाकडे उपलब्ध नाही.

‘त्या’ मुलाची प्रकृती स्थिर

दोन दिवसांपूर्वी पतंगच्या मांजाऐवजी विजेची तार पकडून एक दहा वर्षीय मुलगा गंभीररित्या भाजला होता. मेडिकलमध्ये उपचारादरम्यान त्याचा एक पाय कापावा लागला. आता या मुलाची प्रकृती स्थिर असून तो उपचाराला चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती मेडिकलच्या डॉक्टरांनी दिली.

“मेडिकलमध्ये पतंगांमुळे जखमी ९ जण उपचाराला आले. सगळ्यांवर तातडीने उपचार केले.” -डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 22 people in hospital due to nylon manja use in kites mnb 82 mrj
Show comments