नागपूर: उपराजधानीतील वीज वितरण यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी महावितरणने २३८ कोटींच्या कामांचे कार्यादेश दिले, तर ७५ कोटी रुपयांच्या कामाच्या निविदा लवकरच निघेल. दक्षिण पश्चिम नागपुरातील वीज यंत्रणाही भूमिगत होईल, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.

गुरुवारी पार पडलेल्या नागपुरातील प्रादेशिक विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे, प्रादेशिक संचालक परेश भागवत, कार्यकारी संचालक (पायाभूत आराखडा) धनंजय ओंढेकर, मुख्य अभियंता दिलीप दोडके उपस्थित होते. यावेळी लोकेश चंद्र म्हणाले, नागपूरचा विकास झपाट्याने होत असून येथे आर्थिक उलाढाल वाढली आहे. परिणामी, विजेची मागणीही वाढली आहे. त्यामुळे येथे दर्जेदार वीज पुरवठ्यासाठी महावितरणने वीज यंत्रणा सक्षमीकरणाचे काम सुरू केले आहे.

हेही वाचा >>>नागपूर : मुख्यमंत्री म्हणाले ” राहुल गांधी विदेशात देशाची बदनामी करतात….”

दक्षिण पश्चिम नागपुरात वीजवाहिनी भूमिगत करण्यासाठी ४६ कोटींचा खर्च येणार आहे. त्यामुळे अपघात कमी होतील. काँग्रेसनगर विभागात २१.७५ कोटी आणि महाल विभागातील २४.८५ कोटी रुपयांचे काम होईल. महावितरणच्या संचालक मंडळाने नुकत्याच या कामांना मंजुरी दिली. शहर आणि परिसराला सध्या १३२/३३ केव्ही क्षमतेच्या बेसा, पारडी, उप्पलवाडी, मानकापूर, खापरी, हिंग़णा १ व हिंगणा २ या अतिउच्चदाब क्षमतेच्या उपकेंद्रांमधून वीज पुरवठा होतो. पण, वाढत्या मागणीमुळे या उपकेंद्रांवर क्षमतेपेक्षा अधिक भार येत आहे. त्यामुळे भार कमी करण्यासाठी आणि भविष्यातील मागणी ध्यानात घेऊन जाटतरोडी येथे १३२/३३ केव्हीए अतिउच्चदाब उपकेंद्राचे काम अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय १३२/३३ केव्ही लेंड्रा पार्क, १३२/३३ केव्ही मिहान येथे नवीन अतिउच्चदाब उपकेंद्र तसेच १३२/३३ केव्ही बेसा, पारडी व मानकापूर उपकेंद्रात प्रत्येकी ५० एमव्हीएचे अतिरिक्त रोहित्र उभारण्याची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचेही लोकेश चंद्र म्हणाले.

हेही वाचा >>>नागपूर : राज्यातील २८५६ कैद्यांनी धरली शिक्षणाची वाट आणि …

या भागात नवीन वाहिन्या…

महापारेषणने उभारलेल्या उपकेंद्रातून अतिरिक्त ३३ केव्ही नवीन वाहिन्यांचे जाळे मजबूत करण्यासाठी ९५ कोटींची निविदा निघाली. याद्वारे महापारेषणच्या अतिउच्चदाब उप्पलवाडी, अंबाझरी, जाटतरोडी व खापरखेडा उपकेंद्रातून नवीन ३३ केव्ही वाहिन्या उभारण्यात येतील. महाल विभागातील यंत्रणा सक्षमीकरणासाठी ६७.१८ कोटींच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. यामध्ये ३३/११ केव्ही बेसा, मानेवाडा आणि श्रीकृष्ण नगर या उपकेंद्रांचा समावेश आहे. गांधीबाग विभागासाठी १३.७४ कोटी, काँग्रेसनगर विभागासाठी १८.०७ कोटी, सिव्हिल लाईन्स विभागासाठी ११.२३ कोटई आणि बुटीबोरी विभागासाठी ७.६५ कोटीच्या निविदा प्रक्रिया सुरू आहेत. ३३/११ केव्ही मानकापूर उपकेंद्र व कळमना उपकेंद्रात १० एमव्हीएच्या अतिरिक्त रोहित्र उभारला जाणार असल्याचेही लोकेश चंद्र यांनी सांगितले.