बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या ८७ किलोमीटर अंतराच्या समृद्धी महामार्गावर अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. आता या टप्प्यात २४ तास पोलिसांची गस्त सुरू करण्यात आली आहे. तसेच महामार्ग संमोहनसंदर्भातही उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी येथे दिली.
स्थानिक पोलीस मुख्यालयात बुधवारी संध्याकाळी आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी विविध उपाययोजना विशद केल्या. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारीद्वय प्रदीप पाटील, गुलाब वाघ, पोलीस निरीक्षक जितेंद्र आडोळे हजर होते. यावेळी महामुनी म्हणाले की, २५ प्रवाशांचे बळी घेणाऱ्या खासगी बस अपघाताचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. पुढील महिन्यात न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात येईल. जिल्ह्यातील समृद्धी मार्गावरील अपघात रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी पाहणीअंती निर्देश दिले होते. त्यानुसार ८७ किलोमीटर अंतरात ४ वाहनाद्वारे २४ तास गस्त घालण्याचे नियोजन असून सध्या २ वाहनांद्वारे गस्त घालण्यात येत आहे. या वाहनांमध्ये समन्वय रहावा यासाठी बिनतारी संदेश यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. मेहकर इंटरचेंजवर ही यंत्रणा सुरू झाली असून त्याला एक वेगळे ‘चॅनेल’ देण्यात आले आहे. महामार्गावर विविध रंगी झेंडे, मार्गदर्शनपर फलक लावण्यात येत आहे.
हेही वाचा >>>अनिल देशमुख स्पष्टच म्हणाले, ‘आज बच्चू कडूंनी अस्वस्थता व्यक्त केली, पुढे एक एक बोलायला लागतील…’,
रंबल स्ट्रीप, क्रश बॅरिअर आणि रिफ्रेशमेंट सेंटर
दुसरीकडे राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने महामार्गावर ‘रंबल स्ट्रीप’ तर पुलावर ‘क्रश बॅरिअर’ लावण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या आठवड्यात हे काम पूर्ण होईल, असे महामुनी यांनी सांगितले. वाहने जिल्हा हद्दीत ज्या ठिकाणी प्रवेश करतात त्या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्यासाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहे. आग विझविण्यासाठी ‘फोम डेपो’ कार्यान्वित करण्यात येणार असून जास्तीत जास्त ‘रिफ्रेशमेन्ट सेंटर’ सुरू करण्यासाठी महामंडळाला सूचित करण्यात आले आहे.
हेही वाचा >>>नागपूर :’भाजपचे राजकारण महाराष्ट्राला कलंक ‘,ठाकरे गटाचे आंदोलन, फडणवीसांचा फलक फाडला
वेगावर निर्बंध
खासगी बसच्या भीषण अपघातानंतर समृद्धी महामार्गावर प्रवास करणारी वाहने सुरक्षित वा नियंत्रित वेगाने ये-जा करीत असल्याचे सुखद चित्र आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाने लावलेल्या ‘स्पीड गन’च्या माध्यमाने हे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. अलीकडे निर्धारित वेगापेक्षा जास्त वेगाने जाणाऱ्या व कारवाई करण्यात आलेल्या वाहनांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे आढळून आले आहे.