अमरावती : येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी) एका ३५ वर्षीय महिलेच्या पोटातील ट्यूमरची जटिल शस्त्रक्रिया करण्यात आली. चार तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत २४.४ किलो वजनाचा गोळा काढून डॉक्टरांनी त्या महिलेला जीवनदान दिले. धारणी तालुक्यातील खटणार येथील ३५ वर्षीय महिला तीन मुलांची आई आहे. मागील आठ ते नऊ महिन्यांपासून पोटाचा आकार वाढत चालला होता. यावेळी अधूनमधून पोटात दुखायचे म्हणून महिलेने जवळच्या रुग्णालयात जाऊन तपासणी केली.
तपासणीअंती या महिलेच्या पोटात पाणी आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर उपचार घेऊन किमान तीन ते चार वेळा पोटातील पाणी काढण्याचे प्रयत्न देखील झाले. परंतु, पोटाचा आकार कमी होईना आणि त्रासही होत होता. तसेच त्या महिलेला श्वास घेणेही कठीण झाल्याने खाणे पिणेही बंद झाले होते. याशिवाय अशक्तपणा वाढला. यामुळे शरीरातील रक्त कमी झाले होते. त्यामुळे स्थानिक डॉक्टरांनी अमरावती येथील विभागीय संदर्भसेवा रुग्णालयात या महिलेला पाठवले. या वेळी महिलेची तपासणी केली असता पोटात पाणी नसून मोठी गाठ असल्याचे निदर्शनास आले.
ही गाठ पोटात सर्वत्र परसरली. त्यामुळे शहरातील आतड्या, छाती (फुप्फुस) पोट, किडनी, इतर अवयव दबल्या गेले. सुपर स्पेशालिटी येथील डॉक्टरांनी सीटीस्कॅन व इतर तपासण्या केल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. कॅन्सर हार्मोन सीए १२५ जे साधारण ३५ च्या खाली हवे, ते रुग्ण महिलेमध्ये १ हजारपेक्षा जास्त वाढलेले होते. रक्त अत्यंत कमी असल्याने २ रक्त पिशव्या देण्यात आले. डॉक्टरांना शस्त्रक्रिया करताना लहान मोठे आतडे, पोटावरील चरबीचा पडदा सगळे ट्यूमरला चिकटलेले होते.
ही शस्त्रक्रिया ४ तास चालली आणि २४.४ किलोचा गोळा काढण्यात आला. महिलेला डाव्या अंडाशयाचा कॅन्सर असल्याचे आढळून आले. ही शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विनामूल्य करण्यात आली. यामध्ये विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनात स्त्री कर्करोग विशेषज्ज्ञ डॉ. भावना सोनटक्के यांनी ही शस्त्रक्रिया पार पाडली. भूलतज्ज्ञ डॉ. सचिन गोंडाणे, डॉ. चेतन देऊळकर, ओटी इन्चार्ज बिल्कीस सिस्टर, डॉ. माधव घोपरे, शीतल बोंडे, कोमल खाडे, जया वाघमारे, अपेक्षा वाघमारे, शंकर, गोविंद, लक्ष्मी यांनी सहभाग घेतला.