ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघ, बिबट तथा अन्य वन्यजीव प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, ताडोबात २४ प्रकारच्या गवताच्या विविध जाती आहेत. गवताच्या अशा विविध जाती अन्य कुठल्याही प्रकल्पात नाही. यातील गवताच्या काही जाती अतिशय दुर्मिळ आहेत. यामुळे ताडोबाच्या जंगलाचे समृद्धी मध्ये आणखी भर पडली आहे.
हेही वाचा >>>12th Exam : विद्यार्थ्यांकडे ‘कॉपी’ सापडल्यास पर्यवेक्षकाची उचलबांगडी!
येथील गवत आणि वनस्पतींची मुळे जमिनीतील पाण्याचा ओलावा टिकवून ठेवतात आणि उन्हाळ्यात त्याचे बाष्पीभवन होण्यापासून रोखतात, ज्यामुळे जमिनीची गुणवत्ता टिकवून ठेवण्यास खूप मदत होते. ताडोबा सुमारे ८८५ हेक्टर गवताळ प्रदेश व्यापतो हा भूभाग ताडोबातील एकूण भूमीच्या नऊ टक्के इतका आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरात नैसर्गिक गवताळ प्रदेश नाही. मात्र नवेगाव, जामनी, पांढरपौनी आणि पळसगाव या गावांच्या पुनर्वसनानंतर नवीन गवताळ प्रदेश विकसित आणि शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करण्यात आले आहे. ताडोबातील नवेगाव, जामनी, पांढरपौनी आणि पळसगाव परिसरातील गावांच्या जमिनीवर या गवतांची वाढ करण्यात आली.
एकट्या नवेगाव रामदेगी येथील आधीच्या २३० हेक्टर जमिनीवर २४ विविध प्रजातींचे गवत विकसित करण्यात आले आहेत. त्यांची मराठी नावे मोथा मारवेल गवत, लहान मारवेल गवत, रवी गवत, शिक्का गवत, मोशन गवत, कुसल गवत, घोन्याल गवत, वतन गवत, पडायळ गवत, सुरवेल गवत, रान बाजरी गवत, दतड गवत, देवधन गवत, रानतुर गवत, रानमूग गवत, हेटी गवत, डूब गवत, रान बरबती, गोंडली गवत, जंगली नाचणी, कावळा फळ, बेर गवत, दुर्वा गवत अशी आहेत.
हेही वाचा >>>नागपूर: परीक्षेचा ताण नको, रोजगाराचे शेकडो पर्याय उपलब्ध! तज्ज्ञ डॉ. मंजूषा गिरी व डॉ. प्रवीण डहाके यांचे आवाहन
तसेच निरुपयोगी गवत काढण्यासाठी, ते वेळेवर ओळखून फळ लागण्यापूर्वी ते वर्षातून दोन ते तीन वेळा उपटले जाते. त्यामध्ये भुतगंजा, तरोटा, चिकना, लेंडुळी, चिपडी, आघाडा, पांढरा चिकवा, फेत्रा गवत, कोंबडा गवत, दिवाळी गवत, गाजर गवत, रेशीम काटा या प्रजाती काढल्या जातात. मोहा, बोर, बेहडा, आवडा, आंबा, जांभूळ, चिंच, सीताफळ, जांब, लिंबू, फणस, उंबर, बांबू, कडू निंब, वडाचे झाड, पिंपळाचे झाड, फेत्रा, सिंदू, इंग्लिश चिंच, पाकळी झाड, फणस झाड ही फळे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार या परिसरात सकाळ-संध्याकाळ दोन ते तीन हजार सांबर, चितळ या स्तलांतरित झालेल्या गावांच्या आधीच्या जमिनीवर पाहावयास मिळतात. जंगलातील तृणभक्षक प्राण्यांची संख्याच मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ताडोबाच्या अन्नसाखळीतील सर्वात वरच्या स्तरातील मांसभक्षक वाघ, बिबट्यांचीही या परिसरातील संख्या वाढली ही ताडोबाची यशस्वी गाथा आहे.