अमरावती : अनधिकृत ढाबे आणि फेरीवाल्यांकडे सहज उपलब्ध होणारे मद्य यामुळे अधिकृत परवानाधारक बियर बारचा व्यवसाय पूर्णपणे मोडकळीस आला आहे. केवळ बार चालकांवर लादलेला १० टक्के व्हॅट आणि वार्षिक शुल्कात १५ टक्क्यांची वाढ यामुळे जिल्ह्यातील सुमारे २४ बार बंद पडल्याची माहिती अमरावती जिल्हा वाईन व बिअर बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन मोहोड यांनी दिली आहे.
शासनाकडून परमिट रूम मधील मद्य विक्रीवर १० टक्के व्हॅट करामध्ये वाढ केली. याशिवाय २०२५-२६ च्या नूतनीकरण शुल्कामध्ये १५ टक्के वाढ करण्यात आली आहे. या दोन्ही निर्णयामुळे अनुज्ञप्तीधारकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. हे अवाजवी व अन्यायकारक कर व शुल्क वाढ रद्द व्हावी, अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नितीन मोहोड यांनी केला.
या बारच्या व्यवसायातील सुमारे चारशे प्रत्यक्ष नोकर तसेच त्यावर विसंबून असलेल्या किराणा, अंडे, मांस, पापड, चणे, भाजीपाला इत्यादी पुरवठादार, अशा जिल्ह्यातील सुमारे सहाशे कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधनच बंद झाले आहे.
वाईन शॉप मध्ये बारपेक्षा दारू स्वस्त मिळत असल्याने व ती तिथे विकत घेऊन ढाब्यावर जाऊन मनाप्रमाणे सेवा मिळत असल्याने बारचे ५० टक्के ग्राहक तिकडे वळले आहेत. बरेचसे ढाबेचालक स्वतः साठा ठेवून दारू विक्री करतात. एक्साईज आणि पोलीस प्रशासनाची डोळेझाक असल्याने त्यांचा व्यवसाय बार चालकांपेक्षा दुपटीने वाढलेला आहेत. त्यांना हिशेब देण्याची, व्हॅट आणि वार्षिक शुल्क भरण्याची गरज नसते, असे नितीन माहोड यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाला वारंवार लेखी व बैठकीत प्रत्यक्ष सांगून सुद्धा यांच्यावर कडक कारवाई झालेली नाही. सरकारी विभागांनी जर वाईन शॉपची विक्री आणि बार चालकांची विक्री पाहिली, तर वाईन शॉपच्या विक्रीमध्ये तिपटीने वाढ झाल्याचे आणि वाईन बार च्या विक्रीमध्ये अर्ध्यांनी घट झालेली आकडेवारीत दिसेल, असा दावा नितीन मोहोड यांनी केला आहे.
यासंदर्भात शासनाने स्थापन केलेल्या समिती समोर सुद्धा आम्ही या अडचणी मांडल्या आहेत. त्यानंतर उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बैठक घेऊन अडचणी समजावून सांगितल्या. मात्र त्यांनी शुल्क वाढ कमी केली नाही. व्हॅट संदर्भात समिती निर्णय घेईल असे त्यांनी सांगितले. ३१ मार्च पूर्वी व्हॅट रद्द केला असता तर हे २४ बार बंद झाले नसते, असे नितीन मोहोड यांचे म्हणणे आहे.