लोकसत्ता टीम

चंद्रपूर : महिन्याला २४०० युनिटची वीज निर्मिती करून सावली तालुक्यातील “सादागड हेटी” हे गाव चंद्रपूर जिल्ह्यातील पहिले “सौरग्राम” ठरले आहे.

मुख्य मार्गदर्शक मुख्य अभियंता हरीश गजभे यांचे हस्ते व अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे यांचा सततचा पाठपुरावा आणि जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या उस्फूर्त प्रतिसादमुळे जिल्हा नियोजन सर्वसाधारण योजनेमधून प्रशासकीय मान्यता व निधी वितरण आदेश तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) मीना सालुंखे यांचे त्वरित व उस्फूर्तपणे मदतीने, महावितरण मूल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता चंदन चौरसिया यांची संपूर्ण टीम आणि दी.महाराष्ट्र अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटी ली.चंद्रपूरचे व्यवस्थापक सूरज बोमावर यांच्या त्वरीत प्रतिसादाने गावकऱ्यांसाठी कर्ज उपलब्ध करीत प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत सावली तालुक्यातील सादागड हेटी हे गाव जिल्ह्यातील पहिले “सौरग्राम” ठरले आहे. उद्घाटन प्रसंगी यावेळी चंद्रशेखर दारवेकर कार्यकारी अभियंता , चंद्रपूर विभाग, चंदन चौरसिया उपविभागीय अधिकारी,मूल तसेच विजयकुमार राठोड, उपकार्यकारी अभियंता, चंद्रपूर मंडळ ,मूल उपविभागाचे सर्व कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.

सादागडं हेटी हे गाव मूल पासून १० किमी अंतरावर असून सावली तालुक्यातील टेकाडी गट ग्रामपंचायत अंतर्गत येते. १ शाळा आणि एकुण १९ घरांचा यात समावेश आहे. प्रधानमंत्री सुर्यघर मोफत योजनेतील प्रति किलोवॅट ३० हजार रूपये अनुदानाचा लाभ घेत याठिकाणी १९ घरांच्या छतावर प्रति १ किलोवॅटचे सौर प्रकल्प बसविण्यात आले. त्याचबरोबर शाळेसाठी १ किलोवॅटचे स्वतंत्र सौर प्रकल्प (विना अनुदान) बसविण्यात आले आहे.त्यामुळे एकुण २० किलोवॅटची सौर यंत्रणा बसविण्यात आल्यामुळे महिन्याला सरासरी २४०० युनिटची वीज निर्मिती होणार आहे.

१०० %सौर ग्राम करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली ३ मार्च २०२५ रोजी बैठकीत झालेल्या चर्चेंत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांचेमार्फत प्रस्ताव पाठवून त्यास मंजुरी प्राप्त होऊन अवघ्या २० दिवसात सर्व अडचणी दूर करून महावितरण मुल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता चंदन चौरसिया व टीम , मंडळ कार्यालयाचे श्री.राठोड उप का . अभियंता व सोलर एजन्सी या सर्वांच्या सकारात्मक प्रयत्नाने आणि दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप, क्रेडिट सोसायटी ली. चंद्रपूर यांनी उपलब्ध करून दिलेल्या कर्जामुळे आज सादागड हेटी जिल्ह्यातील पहिले सौर ग्राम ठरले आहे.या गावातील सर्व गावकरी हे आदिवासी समाजातील असून चंद्रपूर जिल्ह्यातील पहिले सौर ग्राम ठरल्यामुळे आनंदी असून शासनाच्या या योजनेवर समाधान व्यक्त केले आहे.