लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर: सोमवार आणि मंगळवारी जोरदार बरसलेल्या पावसाने बुधवारी उसंत घेतली असली तरी मागील शंभर वर्षात प्रथमच जुलै महिन्यात २४२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी १४ ऑगस्ट १९८६ रोजी ३२९ तर १४ सप्टेंबर १९५६ रोजी २४९.४ मि.मी. पाऊस झाला होता.

दरम्यान, महापालिका प्रशासनाने नालेसफाईच्या नावावर जनतेच्या पैशाची उधळपट्टी केल्याने अख्खे चंद्रपूर शहर पाण्यात बुडाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजीव कक्कड यांनी केला आहे.

आणखी वाचा-नागपूर: खापरखेड्यातील राख बंधारा फुटला, शेतांमध्ये राख शिरली; झाले काय वाचा…

शहरात १८ जुलै रोजी चोवीस तासात २४२ मिमी पावसाची नोंद झाली. यापूर्वी १४ ऑगस्ट १९८६ रोजी ३२९, १४ सप्टेंबर १९५६ रोजी २९४.४, १४ जुलै १९८४ रोजी २५४, ४ जुलै २००६ रोजी २३०, १६ जुलै २०१३ रोजी १३४, ४ जुलै २०१६ रोजी १३०, ३० जुलै २०१९ रोजी १३२.९, २४ जुलै २०२२ रोजी ११२.८ पावसाची नोंद झाली होती. वरोरा तालुक्यात १८ जुलैला २२८ मिमी, मूल ५ ऑक्टोबर १९०३ रोजी २७५, ब्रम्हपुरी ३१ ऑगस्ट १९३८ ला ३२३, चिमूरमध्ये ९ ऑगस्ट १९२७ रोजी ३३५.५ पाऊस झाला होता. १८ जुलै रोजी महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे २४ तासांत २७६ मिमी तर देशात कत्रा येथे ३१५ आणि पकल दुल येथे २९६ मिमी पाऊस झाला. यावरून चंद्रपूर पावसाच्या बाबतीत महाराष्ट्रात दुसऱ्या तर देशात तिसऱ्या क्रमांकावर होते.

आणखी वाचा-नागपूरच्या धर्मपाल फुलझेले यांचा मनाली ते खर्दुंगला सायकल प्रवास, ६१ वर्षीय व्यक्तीचा ५५० कि.मी. प्रवास कसा पहा

मुसळधार पावसामुळे नाल्याचे पाणी रस्त्यांवर, रस्त्याचे पाणी लोकांच्या घरात, व्यापाऱ्यांच्या दुकानात शिरले. लहान मुले शाळेत अडकली होती. २०१३ पूर्वी नगरपरिषद असतानाही अशी परिस्थिती उद्भवली नव्हती. नगरपरिषदेचा कारभार महापालिकेपेक्षा बरा होता, अशा शब्दात कक्कड यांनी संताप व्यक्त केला. महापालिका स्वच्छता कर, मालमत्ता कर वसूल करीत असूनही स्वच्छतेच्या नावावर नागरिकांची फसवणूक करीत आहे. जयंत टाकिज चौक, आदर्श पेट्रोल पंप, वाहतूक शाखा, सिटी हायस्कूल, साईबाबा मंदिर, तुकूम परिसरातील मुख्य रस्ता आणि इतर रहिवासी परिसराला तलावाचे स्वरूप आले. या परिस्थितीला महापालिका प्रशासनच जबाबदार आहे, असा आरोपही कक्कड यांनी केला आहे.

शहरातील नाल्यांचे रूंदीकरण करा- आमदार जोरगेवार

मंगळवारी शहरात अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड झाली. या हानीचे पंचनामे तत्काळ करण्याचे आदेश देण्यात यावे, मदत केंद्र सुरू करावे, नाल्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण त्वरित करावे, त्यासाठी निधीची घोषणा करावी, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी पावसाळी अधिवेशनात केली. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे अन्नधान्यासह इतर नुकसान झाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 242 mm rainfall in july for the first time in 100 years in chandrapur rsj 74 mrj
Show comments