चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत गट क च्या विविध संवर्गातील एकूण ५१९ रिक्त पदासाठी तब्बल २५ हजार ३६८ विद्याथ्र्यांनी ऑनलाईन अर्ज केला आहे. सर्वाधिक अर्ज हे कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी आले आहेत.

मागील चार वर्षांपासून जिल्हा परिषदेमध्ये पदभरती झाली नसल्याने शेकडो पदे रिक्त होती. रिक्त पदामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांची कामे होण्यास विलंब होत होता. जिल्हा परिषद प्रशासनाने नुकतीच पदभरतीची जाहिरात प्रसिध्द केली असून चंद्रपूर जिल्हा परिषदेअंतर्गत गट क च्या विविध संवर्गातील ५१९ पदासाठी पदभरती काढण्यात आली आहे. यासाठी आयबीपीएस या कंपनीव्दारे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. २५ ऑगस्ट ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. शेवटच्या तारखेपर्यंत जिल्हा परिषदेच्या ५१९ पदासाठी तब्बल २५ हजार ३६८ विद्याथ्र्यांनी ऑनलाईन अर्ज केला आहे. कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी ७ हजार ११३ अर्ज आले आहेत. त्यापाठोपाठ आरोग्य सेवक पुरूष या पदासाठी ४ हजार ८७९ अर्ज आले आहेत. आरोग्य पर्यवेक्षक पदासाठी १९, आरोग्य सेविका महिला पदासाठी १ हजार ६८७, आरोग्य सेवक पुरूष हंगामी सेवक फवारणी पदासाठी १ हजार २२६ अर्ज आले आहेत.

हेही वाचा >>>किनगाव राजाचा हवालदार एसीबीच्या जाळ्यात, अटक टाळण्यासाठी मागितली लाच; गुन्हा दाखल

औषध निर्माण अधिकारी पदासाठी १ हजार ५७६, प्रयाेगशाळा तंत्रज्ञ पदासाठी ५१५, विस्तार अधिकारी सांख्यिकी पदासाठी ९३ , विस्तार अधिकारी कृषी १९३, विस्तार अधिकारी शिक्षण वर्ग २ व श्रेणी ३ पदासाठी ८४२, पशुपर्यवेक्षक ३४६, कनिष्ठ आरेखक ५७, कनिष्ठ लेखा अधिकारी ६५, वरिष्ठ सहायक लेखा १३०, कनिष्ठ सहायक लेखा ६७१, कनिष्ठ सहायक २ हजार २७९, पर्यवेक्षीका ६३०, कनिष्ठ अभियंता स्थापत्य २ हजार १९५, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ३७४, लघुलेखक निम्नश्रेणी ८१, रिंगमन (दोरखंडवाला) ७६, वायरमन ३२१ अर्ज प्राप्त झाले आहेत. ५१९ पदासाठी तब्बल २५ हजार ३६८ अर्ज आल्याने बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. शासकीय नोकरी मिळविण्यासाठी विद्याथ्र्यांना धावपळ करावी लागत आहे.

Story img Loader