अकोला : पारस औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक चारचा ‘ट्रान्सफॉर्मर बुशिंग’ गरम होऊन आग लागल्याची घटना घडली. वेळीच दखल घेऊन संच क्रमांक चारमधून वीजनिर्मिती बंद करण्यात आली आहे. ‘ट्रान्सफॉर्मर बुशिंग’च्या दुरुस्तीसह वार्षिक देखभालीसाठी संच १५ दिवस बंद राहील. त्यामुळे राज्यातील महानिर्मितीची वीज निर्मिती प्रभावित झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> चंद्रपूर : भाजपचे “मेरा बूथ सबसे मजबूत” अभियान सपेशल अपयशी, पक्षाला केवळ…

महानिर्मितीचे पारस येथे औष्णिक विद्युत केंद्र कार्यरत आहे. याठिकाणी २५० मेगावॉटच्या दोन संचातून वीज निर्मिती केली जाते. या वीज केंद्राने विजेचे उत्पादन करण्यात कायम सातत्य राखले. २५० मेगावॉट क्षमतेचा संच क्रमांक चारमधून सलग अखंडित वीज उत्पादन करण्याचा विक्रम आहे. उन्हाळ्यामध्ये वाढत्या विजेच्या मागणीमुळे राज्यात महानिर्मितीकडून सातत्यपूर्ण वीज निर्मिती केली जात आहे. दरम्यान, पारस औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक चारमधील ‘ट्रान्सफार्मर बुशिंग’ गरम होऊन आग लागल्याची घटना ५ जूनला पहाटेच्या सुमारास घडली. या आगीचे लोळ पारस गावात दुरून दिसत होते. शिवाय मोठा आवाज देखील झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. विद्युत केंद्राच्या प्रशासनाकडून या घटनेची तात्काळ दखल घेण्यात आली. संच क्रमांक चारमधून वीजनिर्मिती बंद करण्यात आली आहे. या घटनमध्ये नुकसान झाले असून दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर हाती घेण्यात आले आहे. पावसाळ्यात विजेची मागणी कमी झाल्यावर देखभाल व दुरुस्तीसाठी पारस येथील संच १५ दिवस ते एक महिन्यासाठी बंद ठेवण्यात येतो.

हेही वाचा >>> सुनील मेंढेंच्या पराभवास पालकमंत्र्यांची निष्क्रियताही कारणीभूत… आ.भोंडेकर यांचा घणाघात….

देखभाल व दुरुस्तीसाठी संच बंद ठेवण्याचे प्रस्तावित असतानाच ‘ट्रान्सफॉर्मर बुशिंग’ला आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे आता ‘ट्रान्सफॉर्मर बुशिंग’च्या दुरुस्तीसोबतच संच क्रमांक चारची वार्षिक देखभाल केली जाणार आहे. त्यासाठी आगामी १५ दिवस चार क्रमांकाच्या संचातून वीजनिर्मिती ठप्प राहील. पारसचा विद्युत केंद्रातील संच क्रमांक तीन सुरळीत सुरू असून त्यातून सध्या २१० मेगावॉट वीजनिर्मिती केली जात आहे.

पारस विद्युत केंद्रातील संच क्रमांक चारच्या ‘ट्रान्सफॉर्मर बुशिंग’मध्ये दोन दिवसांपूर्वी बिघाड झाला. त्याची दुरुस्ती युद्धस्तरावर केली जात आहे. संचातून सातत्यपूर्ण वीजनिर्मिती करण्यात आली. आता राज्यातील विजेची मागणी कमी झाल्याने वार्षिक देखभालीसाठी संच बंद ठेवण्याचे प्रस्तावित होतेच. दुरुस्तीसोबत वार्षिक देखभाल देखील केली जात आहे. १५ दिवसांत संच चारमधून पूर्ववत वीजनिर्मिती सुरू होईल. – शरद भगत, मुख्य अभियंता, पारस औष्णिक केंद्र, पारस.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 250 mw power generation set in paras thermal power close from 15 days ppd 88 zws