गडचिरोली : तेलंगणा आणि छत्तीसगड सीमेवरील घनदाट जंगलात करेगुट्टा टेकडीवर गेल्या ५ दिवसांपासून सुरू असलेल्या मोठ्या नक्षलविरोधी अभियानात २८ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात पोलिसांनी अद्याप अधिकृतरित्या जाहीर केलेले नाही. दोन दिवसांपूर्वी ३-४ नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले होते. नक्षलविरोधी अभियान अजूनही सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो.
कुख्यात नक्षल कमांडर माडवी हिडमा नेतृत्व करीत असलेल्या सर्वात आक्रमक बटालियन क्रमांक १ चे जवळपास ७०० हून अधिक नक्षलवादी छत्तीसगड-तेलंगणा सिमवेरील करेगुट्टा टेकडीवर एकत्र आल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती. यावरून विविध सुरक्षा दलातील तब्बल १० हजाराहून अधिक जवानांनी या परिसरात नक्षलविरोधी मोहीम सुरू केली. गेल्या पाच दिवसांपासून जवानांनी टेकडीला वेढा घातला आहे. यादरम्यान झालेल्या चकमकीत आजपर्यंत (दि. २७ एप्रिल) २८ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. या मोहिमेदरम्यान ५० हून अधिक जवानांना उष्माघाताचा सामना करावा लागला आहे. यातील १५ जवानांना तेलंगणातील वेंकटपूरम आणि भद्राचलम येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. मोहिमेवरील जवानांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून साहित्य पुरवण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी पत्रक काढून ही मोहीम थांबवण्याची विनंती केली होती. मात्र, या टेकडीवर पूर्ण नियंत्रण मिळवल्याशिवाय मोहीम थांबविण्यात येणार नाही, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे येत्या २ ते ३ दिवसात मोठी चकमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
टेकडीवरील गुहेवर ताबा
मोहिमेदरम्यान जवानांनी टेकडीवर असलेल्या एका गुहेवर ताबा मिळवला आहे. तेथून मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, नक्षल कमांडर हिडमा या ठिकाणावरून पसार झाल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे ही मोहीम आणखी किती दिवस चालणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.