चंद्रशेखर बोबडे
नागपूर : गेल्या तीन वर्षांत देशभरातील एकूण २८ हजार १६६ उद्योगांनी पर्यावरणविषयक निकषांचे उल्लंघन केले असून त्यात महाराष्ट्रातील ३,०४२ उद्योगांचा समावेश आहे. केंद्रीय पर्यावरण, वन मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. उद्योग आणि पर्यावरणाचे संतुलन साधण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातात. उद्योगांकडून नियमभंग होत असल्याचे आढळल्यास राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांमार्फत कारवाई केली जाते.
देशभरातील मंडळांकडून मागविण्यात आलेल्या तपशिलानुसार मागील तीन वर्षांत २८ हजार १६६ उद्योगांनी पर्यारणीय निकषांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. यापैकी १८ हजार ९४१ उद्योगांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून २,६१६ उद्योग बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १५८ उद्योगांच्या विरोधात खटले दाखल करण्यात आले आहे. राज्यात ८८,५०५ उद्योग असून त्यापैकी ८६ हजार ८५४ सुरू आहेत. यापैकी ३,०३४ उद्योगांनी पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन केले. यातील २,१६७ उद्योगांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. ६६८ उद्योग बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून २०८ उद्योगांवर कारवाई सुरू आहे.