चंद्रपूर : वाहतुकीच्या नियमांचे होत असलेल्या सर्रास उल्लंघनामुळे चंद्रपुरात अपघाताची संख्या वाढली आहे. महामारीपेक्षाही भयंकर स्थिती अपघातातील मृत्यूच्या आकड्यातून दिसून येत आहे. केवळ चार महिन्यांत जिल्ह्यात तब्बल २८१ अपघात झाले. त्यापैकी १०७ प्राणांतिक अपघात असून, यात ११९ जणांचा मृत्यू, तर १४३ जण जखमी झाले आहे. सरासरीनुसार दिवसाला दोन अपघात होवून एकाला जीव गमवावा लागत आहे.
रस्ता मोकळा असो वा नसो, सुसाट वाहन पळविणे तरुणाईला आनंददायी वाटते. मात्र अपघात घडल्यास संपूर्ण कुटुंबच उघड्यावर येते. बऱ्याचदा अपघातात जखमी होऊन अपंगत्व आल्यानंतर कुटुंबावर भार म्हणून राहावे लागते. वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत वाहतूक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात असली तरी अनेकांकडून नियमांचे उल्लंघन होते. अतिवेगाने वाहने पळवताना अपघात होतात.
हेही वाचा – नेट आणि बीएडचा पेपर एकाचवेळी; अमरावती विद्यापीठाचे विद्यार्थी संभ्रमात
चंद्रपूर जिल्ह्यात जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत तब्बल २८१ अपघात झाले. यात १०७ प्राणांतिक अपघात होते. यात ११९ जणांचा मृत्यू, तर १४३ जखमी झाले आहेत. मागील वर्षी जानेवारी ते एप्रिल २०२२ या चार महिन्यांच्या कालावधीत ३३२ अपघात झाले होते. त्या तुलनेत यंदा अपघाताची संख्या घटली असली तरीही ही अपघाताची आकडेवारी अत्यंत भयावह आहे. नागपूर-चंद्रपूर, चंद्रपूर-गडचिरोली, नागभीड-ब्रह्मपुरी-आरमोरी, राजुरा-आदिलाबाद या महामार्गावर सर्वाधिक अपघात झाले आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहने चालविताना चालकाने वेगावर नियत्रंण ठेवणे आवश्यक झाले आहे.