चंद्रपूर : जिल्ह्यात एकूण १ हजार ३४५ उद्योग आहेत. यात ग्रीनझोनमध्ये ७०८, ऑरेंज झोन ३५४ तर रेड झोनमध्ये २८३ उद्योग आहेत. प्रदूषणाच्या व तापमानाच्या बाबतीत जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. प्रदूषणात ज्या उद्योगाचा काहीही संबंध व भागीदारी नाही, अशा टाटा ग्रुपने १०० कोटी रुपये टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या निर्मितीसाठी उपलब्ध करून दिलेत. रेड झोनमधील कंपन्यांनी याबाबत मुल्यांकन करुन आत्मचिंतन करावे असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी वनस्पती उद्यान (बॉटनिकल गार्डन) येथे आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला वनविभागाचे प्रधान सचिव (वने) वेणुगोपाल रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) शैलेश टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, वन अकादमीचे संचालक एम.एस. रेड्डी, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगांवकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे (विद्युत) अधीक्षक अभियंता हेमंत पाटील, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, उपविभागीय अधिकारी स्नेहल रहाटे, बल्लारपूरच्या तहसीलदार कांचन जगताप, खणिकर्म अधिकारी सुरेश नैताम, सीएसआर समितीचे अध्यक्ष, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच वनाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, जगातील सर्वात जास्त वाघ या जिल्ह्यात आहे. मैसूरच्या आय.ए.एस अकादमीपेक्षा वनविभागाची फॉरेस्ट अकादमी अतिशय उत्तम आहे. तसेच चंद्रपूर-गडचिरोली जंगलक्षेत्राचा गौरव म्हणून जोडण्यासाठी सर्वप्रथम बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी उभारण्यात आले, हे केंद्र रोजगार देणारे केंद्र बनेल, असा विश्वास पालकमंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला. ५० एकरमध्ये ६०० कोटी रुपये खर्च करून भव्य असे एस.एन.डी.टी विद्यापीठाचे उपकेंद्र उभे राहत आहे.
आशियातील पहिले महिलांसाठीचे ट्रेडिशनल स्टेडियम या ठिकाणी तयार होत आहे. देशातील पहिल्या तीन स्टेडियममध्ये सैनिक स्कूल येथील फुटबॉल स्टेडियमला युरोपियन फुटबॉल असोसिएशनने मान्यता दिली. राज्यात स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक फक्त तीनच असून ते चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर स्टेडियम, सैनिक स्कूल व चंद्रपूर जिल्हा स्टेडियम या ठिकाणी आहे. बॉटनिकल गार्डनदेखील जगात प्रथम क्रमांकावर रहावे. रणवीर कपूर, टायगर श्रॉफ व अभिषेक बच्चन या अभिनेत्यांनी चंद्रपूरच्या फुटबॉल ग्राउंडवर खेळण्याची उत्सुकता दर्शविली हे जिल्हयासाठी अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले. येथील कंपन्या स्थानिक गावांच्या मागणीला धरून सी.एस.आरच्या माध्यमातून वाटर प्युरिफायर, गावातील छोटे-मोठे रस्ते पूर्ण करून देतात. जिल्ह्यात निधीची कुठलीही कमतरता नाही. मात्र, एखाद्या विकासकामांचे इस्टिमेट करताना प्रशासन/शासनास अडचणी निर्माण होतात. व हे इस्टिमेट तयार करताना महीने व वर्ष लागतात. कंपनी त्यांच्या सीएसआर निधीमधून जे साहित्य खरेदी करतात ते प्रशासन त्यांच्या डीपीडीसीतून खर्च करू शकते. कंपन्यांनी त्यांचा सीएसआर निधी अशा ठिकाणी खर्च करावा, ज्याठिकाणी प्रशासन/शासनास कामे करताना व कामाचे इस्टिमेट तयार करताना वर्ष लागतात. एखाद्या कंत्राटदारास काम गेल्यास सदर कंत्राटदार ६ महिन्यांच्या कार्याला ७ वर्ष लावतात. अशा कार्यात कंपनीचे सहकार्य आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
कंपन्यांच्या सीएसआरमध्ये या सर्व गोष्टी नसून कंपन्या त्यांच्यामार्फत निविदा काढू शकतात. कंपनीस्तरावर चांगल्या कंत्राटदाराची नियुक्ती करून विकासात्मक कामे चांगल्या नियोजनाने, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करून सदर कामेही कमी कालावधीत पूर्णत्वास येऊ शकेल. कंपनी सीएसआरच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देऊ शकतात. गार्डन खुले विद्यापीठ असून बॉटनिकल गार्डन मनोरंजकच नाही तर ज्ञानवर्धक व रोजगार देणारे केंद्र बनेल. येथे भेट देणाऱ्या पर्यटकांना व नागरिकांना पर्यावरण, वृक्ष व प्राण्यांबाबत माहिती मिळेल. सायन्स पार्क, प्लॅनटोरियम, म्युझिकल फाउंटेन या ठिकाणी तयार होत असून सदर कंपन्यांच्या सीएसआरमधून सदर कामे पूर्णत्वास नेता येईल.
प्रास्ताविक प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) शैलेश टेंभुर्णीकर यांनी केले. यावेळी, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगांवकर यांनी वनविभागाच्या प्रकल्पाविषयीचे सादरीकरण केले. तदनंतर, वनमंत्री मुनगंटीवार यांनी कंपनी प्रतिनिधी व सीएसआर कमिटीच्या अध्यक्षांशी संवाद साधला.