नागपूर: उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर या गृह जिल्ह्यात यंदा विविध तीन घटनांमध्ये कुलरमधून वीज प्रवाहित होऊन ६ ते ७ वर्षांच्या तीन मुलांचा मृत्यू झाला. त्यामुळे कुलर लावताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. एका छोट्याशा चुकीने कुणाच्या बळी जाण्याचा धोका उद्भवतो. त्याला जबाबदार कोण? हा प्रश्न  आहे.

नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील वाढोणा येथे मावशीकडे गंगापुजनासाठी आलेल्या एका ७ वर्षीय शिवम मोहरिया या चिमूकल्याचा हात कुलरला लागल्याने विजेचा धक्का बसून ९ जूनला मृत्यू झाला. तर ७ जूनला शहरातील इमामवडा येथील ७ वर्षीय रुतवा बगडे या चिमुकल्याचा घरातील कुलर सुरु करताना विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्य झाला. यापूर्वी ३० एप्रिल रोजी बारा सिग्नल जवळील बोरकर नगर येथील ६ वर्षीय आकांक्षा संदेले या चिमुकलीचा खेळतांना कुलरला हात लागल्याने मृत्यू झाला.

हेही वाचा >>> “मणिपूरमधील वाद मिटवण्याला प्राथमिकता द्या”, मोहन भागवत यांचे विधान चर्चेत!

दरम्यान कुलरमधून वीज प्रवाहित होऊन यंदाच्या उन्हाळ्यात तब्बल तीन बळी गेल्याने घरो- घरी लागणाऱ्या कुलरच्या सुरक्षेवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे. दरम्यान घरातील कुलर हाताळतांना आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे. उन्हाळ्याच्या सुरवातीलाच महावितरणसह इतरही वीज कंपन्यांकडून सातत्याने या सुरक्षेचे उपाय करण्याचे आवाहनही केले जाते. परंतु घरा- घरात कुलर बसवतांना मात्र नागरिकांकडून या सुरक्षीततेच्या उपायांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यातूनच या वीज प्रवाहित होऊन मृत्यूंच्या घटणा घडतात. त्यामुळे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात निदान या पद्धतीचे मृत्यू टाळण्यासाठी महावितरणसह समाजातील विविध संघटना एकत्र येऊन काही नाविण्यपूर्ण उपक्रम राबवणार काय? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यातच आता पावसाळा तोंडावर आहे. त्यामुळे लवकरच कुलरचा वापर नागपुरातही हळू- हळू कमी होईल. परंतु पुढच्या वर्षी हे मृत्यू टाळण्यासाठी प्रभावी उपाय राबवण्याची गरज विद्युत क्षेत्रातील जाणकार वर्तवत आहे.

हेही वाचा >>> अभिनेते नाना पाटेकर पुत्र मल्हारची संघाच्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती, काय होते औचित्य

कुलरचा अपघात टाळण्यासाठी आवश्यक नागपुरात कधी कुलरजवळ खेळतांना वीजेचा धक्का बसल्याने तर कधी टुल्लू पंप सुरू करतेवेळी विजेचा शॉक लागल्याने मृत्यूच्या घटना अनेकदा बघायला मिळतात. ते टाळण्यासाठी कुलरचा वापर सदैव थ्री पीन प्लगवरच करावा. घरात अर्थ लीकेज सर्कीट ब्रेकर्स बसवून घ्यावे, घरातील अर्थिंग योग्य असल्याची तपासणी करावी, कुलरच्या लोखंडी बाह्यभागात वीज पुरवठा येऊ नये याकरिता कुलरचा थेट जमीनीशी संपर्क येऊ नये अशी व्यवस्था करावी, कुलरमध्ये पाणी भरतांना वीज प्रवाह बंद करून प्लग काढावा, कुलरच्या आतील वीज तार पाण्यात बूडली नसल्याची खात्री करावी, कुलरमधील पाणी खाली जमिनीवर सांडणार नाही याची काळजी घ्यावी, ओल्या हाताने कुलरला स्पर्श करू नये, कुलरची वायर सदैव तपासूण बघा, फ़ायबर बाहयभाग असलेल्या व चांगल्या प्रतीच्या कुलरचा वापर करा, मुले व इतर सदस्य कुलरच्या सानिध्यात येणार नाही याची खबरदारी घेऊन कुलर ठेवा, कुलरमधील पाण्याचा पंप ५ मिनीट सुरू व १० मिनिट बंद ठेवणा­या इलेक्ट्रिकल सर्कीटचा वापर करा यामुळे वीजेचीही बचत शक्य असल्याचे महावितरणचे म्हणने आहे.