जिल्हयाची आजची सकाळ भीषण अपघाताची बातमी घेऊन आली! या भीषण दुर्घटनेने दिवाळी सण साजरा करण्याच्या तयारीत असलेला बुलढाणा जिल्हा अक्षरशः हादरला. राष्ट्रीय महामार्ग सहावर नांदुरा ते मलकापूरदरम्यान वडी फाट्यावर झालेल्या भीषण अपघातात तीन मजूर ठार, तर चार मजूर गंभीर जखमी झाले. इतर नऊ ते दहा मजूर किरकोळ जखमी झाले आहेत.
सर्व जखमींना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. जखमींपैकी चौघांची प्रकृती अत्यावस्थ असल्याने अपघातबळींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हेही वाचा >>> नागपूर – पुणे प्रवास भाडे पाच हजारांवर, प्रवाशांची लूट अन् आरटीओ झोपी
वडी गावावर शोककळा
घटनेतील सर्व मृत आणि जखमी मजूर नांदुरा तालुक्यातील वडी या गावाचे रहिवासी आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या बांधकामावर मजुरी करून ते आपला आणि परिवाराचा उदरनिर्वाह करतात. आजही गावातील पंधरा मजूर नेहमीप्रमाणे कामावर निघाले तेंव्हा त्यांना आपल्यासमोर नियतीने काय मांडून ठेवले, याची कल्पनाही नव्हती.
हेही वाचा >>> फटाक्यांच्या मोसमात पावसाची आतषबाजी, महाराष्ट्रात पुन्हा…
आज सकाळी पंधरा मजूर घेऊन एक ट्रॅक्टर राष्ट्रीय महामार्ग ओलांडत होता. यावेळी भरवेगात येणाऱ्या मालवाहक वाहनाने (कंटेनरने) ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. यामुळे दोघा मजुरांचा जागीच तर अन्य मजुराचा उपचारासाठी नेताना मृत्यू झाला. अपघाताची माहिती गावात येऊन धडकताच गावकरी आणि आजुबाजूच्या गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. नांदुरा आणि अन्य पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी देखील दाखल झाले.
घटनेची माहिती मिळताच ओम साई फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेसह स्वयंसेवक व नांदुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार विलास पाटील, नांदुरा तहसीलदार मुकूंदे सर्व यांची चमू घटनास्थळी मदत करण्यासाठी दाखल झाली. यावेळी संतप्त गावकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग सहावर उत्स्फूर्तपणे रास्ता रोको सुरू केला. यामुळे वाहतूक ठप्प झाल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजुंनी वाहनांच्या दीर्घ रांगा लागल्या. तब्बल तीन तासांपासून रास्ता रोको सुरु आहे. या अपघाताची माहिती कळताच वडी (ता. नांदुरा) हे चिमुकले गाव हादरले असून ऐन दिवाळीत गावावर शोककळा पसरली आहे.