नागपूर : शांतीनगरात राहणारे आफताब आणि रिया (काल्पनिक नाव) यांचे एकमेकांवर प्रेम होते. रियाचे वडील शासकीय नोकरीत होते. उच्चशिक्षित असलेल्या रियाने नळ दुरुस्तीचे काम करणारा प्रियकर आफताबशी लग्न करण्याचे ठरवले. परंतु, दोघांच्याही कुटुंबीयांनी प्रेमविवाहास विरोध केला. त्यामुळे दोघांचाही हिरमोड झाला. मात्र, दोघांच्या भेटी सुरू होत्या. त्यातून रिया गर्भवती झाली. मुलगी गर्भवती असल्याचे कळताच तिच्या आईने तिला घरातून बाहेर काढले. तर आफताबच्या कुटुंबीयांनी तिला घरात घेण्यास विरोध दर्शवला. तरीही दोघांनी बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. सात महिन्यांची गर्भवती असताना तिची भेट पिंकी ऊर्फ सुजाता लेंडे (रा. चिखली, कळमना) हिच्याशी झाली. तिने बाळाला जन्म दिल्यानंतर विक्री करण्याचा सल्ला दिला. आफताब आणि रिया यांनी सहमती दर्शवली.
हेही वाचा >>> बाळ विक्री करणाऱ्या रॅकेटचे धागेदोरे भंडाऱ्यापर्यंत; चौघांवर गुन्हा दाखल
ऑक्टोबरमध्ये रिया प्रसूत होणार होती. त्यापूर्वीच राजश्री सेन आणि पिंकी लेंडे यांनी तेलंगणातील पाटील दाम्पत्याशी सौदा केला. मुलगी झाल्यास ३ लाख आणि मुलगा झाल्यास ५ लाख रुपये असे या करारात ठरले. अग्रिम म्हणून राजश्री सेनने ३१ हजार खात्यात टाकण्यास सांगितले. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रियाने मुलीला जन्म दिला. राजश्रीने तेलंगणातील पाटील दाम्पत्याला बाळाचे छायाचित्र पाठवले. त्यानुसार उर्वरित रक्कम मिळवण्यासाठी राजश्रीचा आटापिटा सुरू होता.
असे फुटले बिंग
राजश्री आणि पिंकी यांनी बाळाला तेलंगणाच्या दाम्पत्याला स्वाधीन करण्याची तयारी सुरू असतानाच राजश्रीवर बाळविक्रीचा गुन्हा दाखल झाला. ‘एएचटीयू’च्या प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक रेखा संकपाळ यांनी केलेल्या चौकशीत राजश्रीचे पाप उघडकीस आले. शांतीनगरचे ठाणेदार यांनी पिंकीला ताब्यात घेतले आणि हवालदार सुनील वाकडे यांच्या फिर्यादीवरून दुसरा गुन्हा दाखल केला.
आणखी एक गुन्हा दाखल
बाळ विक्री केल्याचे एकामागून एक गुन्हे उघडकीस येत असून राजकीय व्यक्तींच्या गराड्यात राहणाऱ्या राजश्री रणजीत सेन हिने आणखी एका बाळाच्या विक्रीचा सौदा केला होता. प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला तेलंगणातील दाम्पत्याशी ५ लाख रुपयांत विक्री करण्याचा करार केला होता. याप्रकरणी आणखी एक गुन्हा मानवी तस्करी विरोधी पथकाने (एएचटीयू) दाखल केला.