विवाह नोंदणी संकेतस्थळावरून ओळखीनंतर लग्न ठरलेल्या नवरदेवाने होणाऱ्या पत्नीकडून तीन लाख रुपये उकळले. त्यानंतर तिला लग्नास नकार दिला. याप्रकरणी सदर पोलिसांनी सुमित महादेव बोरकर (४०, रामनगर, गोंदिया) याला अटक केली. त्याने आतापर्यंत जवळपास ७० ते ८० तरुणींशी लग्न ठरवून पैसे उकळले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गड्डीगोदाम गौतमनगर परिसरात राहणाऱ्या एका ४० वर्षांच्या महिलेने तिच्या लग्नासाठी ‘जीवनसाथी डॉट कॉम’वर प्रोफाईल तयार केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> शिंदे गटाच्या शिवसेनेला नागपूरमध्ये पदाधिकारी सापडेना, केवळ तीनच नियुक्त्या

आरोपी सुमित महादेव बोरकर, ऊर्फ सोहम वासनिक (रा. रामनगर, रेलटोली गोंदिया) याने तिच्याशी संपर्क साधला. त्यानंतर तिच्या घरी आला व लग्नाची इच्छा दर्शवली. त्या दोघांनी लग्नाची तयारी केली. त्याने तिला विश्वासात घेऊन ‘आई आजारी असून उपचारासाठी आर्थिक गरज आहे’ असे सांगितले. तिने रोख नसल्याचे सांगत लगेच सोन्याच्या बांगड्या (वजनी ५० ग्रॅम, किं. २ लाख ७५ हजार रुपये) त्याला दिल्या. त्यानंतर आरोपी तिला भेटला व नंतर तो अचानक बेपत्ता झाल्याने तिने त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला. मात्र, तो बंद होता. वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद न मिळाल्याने तिने सदर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. १५ जुलै ते ६ सप्टेंबर २०२२ दरम्यान हा प्रकार घडला. सदर पोलिसांनी याप्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवला.

हेही वाचा >>> दुबईतून नागपुरात सोन्याची तस्करी, विमानातून उतरताच तिघांनी केली लुटमार

चंद्रपुरातील कोठारी परिसरात राहणाऱ्या ५० वर्षीय विधवेशी त्याने फेसबुकवरून मैत्री केली.तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. अकोला शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असल्याचे सुमितने तिला सांगितले. तिने सुमितला घरी बोलावले आणि त्याने रात्रभर मुक्काम केला. सकाळी ती विधवा भाजी आणण्यासाठी बाजारात गेली असता सुमितने तिचे २४ तोळे सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला. चंद्रपूर गुन्हे शाखेचे बाळासाहेब खाडे यांच्या पथकाने सुमित बोरकर याला अटक केली.सुमित बोरकर ऊर्फ सोहम वासनिक हा लाखांदूर तालुक्यातील रहिवाशी आहे. तो भंडाऱ्यातील कॉलेजमध्ये कंत्राटी प्राध्यापक आहे. पैसे कमावण्यासाठी उपवर असलेल्या तरुणींना विवाह नोंदणी संकेतस्थळावरून शोधतो.त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढतो. त्यांना लग्न करण्याचे आमिष दाखवतो. त्यानंतर लग्नापूर्वीच तरुणींची भेट घेऊन आई आजारी असल्याचे सांगून पैसे उकळतो, अशी त्याची गुन्ह्याची पद्धत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 lakhs scammed by a young man on a marriage registration website by promising marriage amy