भामरागड तालुक्यातील केळमारा जंगल परिसरात झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत पेरमीली दलम कमांडर कुख्यात नक्षलवादी बिटलू मडावीसह तीन नक्षलवाद्यांना ठार करण्यात गडचिरोली पोलिसांच्या ‘सी-६०’ पथकाला यश आले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोपनीय माहितीच्या आधारे रविवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी ‘सी-६०’ पथकाने भामरागड तालुक्यातील केळमारा जंगल परिसरात अभियान राबवले होते.
हेही वाचा >>> नागपूर : जन्मदात्या आईचा खून करणाऱ्यास जन्मठेप
दरम्यान, दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ३ जहाल नक्षलवादी ठार झाले. यामध्ये पेरमीली दलम कमांडर कुख्यात बिटलू मडावी याच्यासह डीव्हीसी वासू आणि अहेरी दलम सदस्य श्रीकांत ठार झाला. काही दिवसांपूर्वी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मर्दहूर येथील साईनाथ नरोटे हत्याप्रकरणात बिटलू मुख्य आरोपी होता. तर वासू याची नुकतीच डीव्हीसी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मर्दिनटोला चकमकीनंतर पोलिसांचे मोठे यश असल्याचे बोलल्या जात आहे.