अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका महिला डॉक्टरने पतसंस्थेच्या लॉकरमधून साडेतीन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने काढले. या डॉक्टरच्या मागावर असलेल्या तीन महिलांनी दागिन्यांवर काही मिनिटांत हात साफ केला. याप्रकरणी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका महिला डॉक्टरने शहरातील गांधी मार्गावरील एका पतसंस्थेच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने काढून घेतले आणि नवीन कापड बाजारातील कापडाच्या दुकानात खरेदीसाठी गेली. यावेळी बुरखाधारी तीन महिलांनी महिला डॉक्टरचा पाठलाग करून तिच्या पर्समधील सोन्याचे दागिने असलेली छोटी पर्स काढून दुकानातून पोबारा केला. अवघ्या पंधरा मिनिटांत हा प्रकार घडला. धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने शहर कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली.
हेही वाचा – चंद्रपूर : राज्यातील पाच व्याघ्र प्रकल्पात ७५ हजार शाळकरी मुलांना मोफत व्याघ्र सफारी!
पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. संशयित बुरखा परिधान केलेल्या तीन महिला दिसून आल्या, मात्र ओळख पटू शकली नाही. पोलिसांनी अनोळखी महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.