अकोला : वाशीम जिल्ह्याच्या कारंजा शहरात एक अत्यंत दुर्दैवी व हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरासमोर खेळतांना एक तीन वर्षीय चिमुकला सात ते आठ फूट खड्ड्यात जाऊन पडला. त्या खड्ड्यातील पाण्यात बुडून चिमुकल्याचा अंत झाला. या घटनमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
कारंजा शहरातील समता नगरमधील रहिवासी मोहम्मद अरजान हा तीन वर्षीय चिमुकला घरातून बेपत्ता झाला होता. कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध केली. मात्र, तो दिसून आला नाही. सायंकाळी ७ वाजेपर्यंत सर्वत्र शोधूनही चिमुकला न आढळल्याने कुटुंबीय अस्वस्थ झाले. दरम्यान, परिसरातील एका व्यक्तीने मोहम्मद अरजानला घराजवळीच एका खड्ड्याजवळ खेळताना पाहिले होते. त्याने कुटुंबीयांना ही माहिती दिली. समोरील घराच्या बाजूला एक मोठा सात ते आठ फूट खोल खड्डा होता. त्या खड्ड्यात चिमुकला पडला असावा, असा अंदाज व्यक्त केल्या गेला. तो खड्डा पाण्यात भरला होता. जेसीबीच्या मदतीने खड्डयात साचलेले पाणी बाहेर काढण्यात आले. खड्ड्यातील पाणी ओसरताच तीन वर्षीय मोहम्मद अरजानचा मृतदेह देखील बाहेर आला. त्याला ताबडतोब शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. उपस्थित डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. हे कळताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. या घटनेची माहिती नातेवाईकांनी कारंजा शहर पोलीस ठाण्यात दिली. मोहम्मद अरजानची उत्तरीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणी कारंजा पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
हार्वेस्टर आणि दुचाकीच्या अपघातात एकाचा बळी
हार्वेस्टर आणि दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. रिसोड-लोणार मार्गावरील शेलू खडसे फाट्याजवळ ही घटना घडली. दुचाकीस्वार संजय गणपत गोरे (वय ४८, रा. एकलासपूर, ता. रिसोड, जि. वाशिम) यांचा मृत्यू झाला. संजय गोरे हे लग्नसमारंभ आटोपून दुचाकीने (क्र. एमएच ३७ एसी १५४१) पत्नी आणि मुलासह गावी परत जात होते. हार्वेस्टर (क्र. पी.बी. ३४ सी. ६८५६) विरुद्ध दिशेने आला. हार्वेस्टरच्या मागील चाकाला दुचाकी धडकल्याने ते रस्त्यावर पडले. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. पत्नी आणि मुलगा थोडक्यात बचावले. हार्वेस्टर चालक भोलासिंग सोर्जनसिंग (वय ३८, रा. राणीवाला गाव, ता. मोटनोर, जि. मुकसम, पंजाब) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.