वर्धा, एखादा बालक दहा दिवसापासून बेपत्ता आणि त्याचा कसलाच मागमूस लागत नसेल तर काय झाले असावे, अशी भितियुक्त शंका उभी राहील. पोलीस व वनखाते या बालकाचा शोध घेता घेता बेजार झाल्याचे चित्र आहे. गत महिन्यात जिल्ह्यात अंधश्रद्धापूरक साहित्य व प्राणी तस्करी आढळून आल्याने मुलाचे बेपत्ता होणे रहस्यमय ठरत आहे. आर्वी तळेगाव रस्त्यावर मांडला गावाबाहेर असलेल्या जंगल भागात चार पाच कुटुंब राहतात. ते मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथून या ठिकाणी आलेत. टेकडी व कालव्याच्या मधात राहुटी ठोकली. ही कुटुंबे भाडे तत्ववार शेती करीत उदरनिर्वाह भागवितात.

यापैकीच एक एअरसिंग रुपसिंग चहल यांचा तीन वर्षीय कार्तिक हा मुलगा १२ मार्चपासून बेपत्ता आहे. घराजवळ शौचास जातो असे सांगून तो घराबाहेर पडला आणि अजून घरी आलेला नाही. चहल कुटुंबात पती, पत्नी व सहा मुलं आहेत. पिढीजात दारिद्र्य, हाताला काम नाही म्हणून वर्षभरपूर्वी ते या निर्जन स्थळी आले. गावचे सरपंच धुर्वे यांची जंगलात तळ्याकाठी शेती आहे. ती कसायला घेतली. परंतू पेरले ते उगवलेच नाही म्हणून आर्थिक फटका बदला. आता रोजमजुरी करतात. प्रामुख्याने जंगलात भटकंती. घटनेच्या दिवशी वडील कामावर व आई जळावू लाकडे वेचण्यास जंगलात गेली.

तीन महिन्याचे बाळ पाळण्यात व इतर मुलांना एकमेकांवर लक्ष ठेवण्यास सांगून आई घराबाहेर पडलेली. कार्तिक घराबाहेर पडल्यानंतर आई काही वेळाने घरी परतली तेव्हा कार्तिक दिसला नाही. म्हणून ती त्याच्या शोधात फिरू लागली. नंतर वडील व त्यांचे सहकारी पण शोधू लागले. पण मागमूस नं लागल्याने पोलीस व वन खात्यास कळविण्यात आले. गावकरी, पोलीस व वन कर्मचाऱ्यांनी मिळून शोध सूरू केला. पण थांगपत्ता नाही. शोध घेत असतांना कार्तिक तर दिसून आलाच नाही पण ना कपडे, कुठे काही रक्त पण दिसले नाही.

हा प्रकार अधिक रहस्यमय ठरत गेला. कारण एका अज्ञात व्यक्तीने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सचिव गजेंद्र सुरकार यांना फोनवरून या बेपत्ता प्रकरणात अंधश्रद्धा तर नसावी नां, अशी शंका १८ मार्चला व्यक्त केली. सुरकार यांनी लगेच १९ मार्चला जिल्हा उपवनसरक्षक यांची भेट घेतली. तेव्हा तळेगाव वनपरीक्षेत्र अधिकारी सूर्यवंशी यांच्याकडून झालेला तपास समजून घेण्यात आला. वन्यजीव हल्ला किंवा फरफटत  नेल्याचा पुरावा नाहीच. पण खबरदारी म्हणून ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहे.

वन कर्मचारी अजूनही जंगल पिंजून काढत आहे. पण शरीराचा कोणताच भाग किंवा दुर्गंधी दिसून येत नाही. ही माहिती मिळाल्यावर सुरकार व त्यांचे सहकारी प्रकाश कांबळे हे घटनास्थळी जंगलात पोहचले. आईशी भेट होताच तिने मुलाच्या विरहाने हंबरडाच फोडला. अधिक चौकशी केली. वन अधिकारी व कर्मचारी यांचे शोधकार्य विचारले. नरबळी, अघोरी पूजा या अंगाने निरीक्षण केले. पण ठोस असे काहीच गावकरी व झोपडीतील अन्य शेजारी यांच्याशी झालेल्या चर्चेत आढळून आले नसल्याचे सुरकार सांगतात.

बेपत्ता झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी होळी असल्याने अंधश्रद्धाविषयक सर्व बाबी तपासल्या पण आक्षेपर्ह असे काही दिसले नाही. या घटनेत अनेक बाबतीत अनुत्तरीत प्रश्न उपस्थित झाले आहे. म्हणून सोमवारी या अनुषंगाने पोलीस अधीक्षक यांना भेटून या बेपत्ता प्रकरणाचा सर्व अंगाने तपास करण्याची विनंती केल्या जाणार. एक महिन्यात काहीच तथ्य नं दिसून आल्यास सीबीआयकडे हा तपास सोपविण्याची विनंती संघटने तर्फे करण्यात येईल, असे सुरकार यांनी स्पष्ट केले.