महेश बोकडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर: लग्नसमारंभ, उन्हाळ्यांच्या सुट्ट्यांमध्ये नागरिक बाहेरगावी जात असल्याने हाॅटेल व्यवसायात ३० टक्यांनी घट झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. नागपुरातील सावजी पदार्थांचे नावही घेतले तरी अनेकांच्या तोंडात पाणी येते. देश-विदेशातील नागरिक नागपुरात आले की सावजी पदार्थांवर ताव मारतात. करोना काळात या व्यवसायाला आर्थिक फटका बसला होता.

निर्बंध शिथिल झाल्यावर हा व्यवसाय पूर्वपदावर आला. हल्ली नागपुरात नवीन उपाहारगृहांची संख्याही वाढत आहे. नागपूर जिल्ह्यात सध्या लहान-मोठे सुमारे दीड ते दोन हजार सावजी, भोजनालये, हॉटेल्स, उपाहारगृह आहेत. त्यात सावजी भोजनालय व खानावळींचीही संख्या सर्वाधिक आहे. परंतु, सध्या शाळा- महाविद्यालयांना सुट्ट्या लागल्या आहेत. अनेक जण सहकुटुंब पर्यटनाला गेले आहेत. शिवाय मोठ्या प्रमाणात लग्न समारंभांची रेलचेल आहे. त्यामुळे हाॅटेल व्यवसायात सुमारे ३० टक्क्यांची घट नोंदवली गेली, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. पुढचे काही दिवस ही घट कायम राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा…यवतमाळ : ‘नीट’ बनावट परीक्षार्थी तपासासाठी ‘एसआयटी’

“उन्हाळ्यात सायंकाळी किंवा रात्री ग्राहक गार्डन रेस्टॉरन्ट किंवा तत्सम प्रकारच्या हॉटेल्सला पसंती देतात. दिवसा बंदिस्त हॉटेल्समध्ये जातात. परंतु, यंदा पर्यटन करणाऱ्यांची संख्या वाढल्याने व्यवसाय सुमारे ३० टक्क्यांनी घटला आहे.” – हर्षल रामटेके, संचालक, होरिझन इंडिया ग्रुप, नागपूर.

“गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ्यात ग्राहकांच्या संख्येत १५ टक्के घट झाली आहे. मागच्या वर्षी हे प्रमाण ४० टक्के होते. यंदा अवकाळी पावसामुळे तापमान कमी असल्याने ग्राहकांकडून मांसाहारी पदार्थांची मागणी वाढली आहे.” – मोहम्मद रफीक शेख, अरेबियन तंदूर रेस्ट्राॅरेंट, जाफरनगर

“सावजी भोजनालयात सध्या ग्राहकांची गर्दी नेहमीच्या तुलनेत थोडी कमी झाली आहे. मात्र लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रमांमुळे सावजी मटण, चिकनसह शाकाहारी पदार्थांचीही मागणी चांगली आहे.” – रोशन पौनीकर, विठोबा सावजी भोजनालय.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 30 percent decline in restaurant business due to weddings and summer vacations in nagpur mnb 82 dvr