बुलढाणा : जिल्हा परिषदेवर मोर्चे, आंदोलन ही सामान्य बाब आहे. मात्र, आज तीनएकशे विद्यार्थ्यांसह पालकांनी धडक देत मुख्य प्रवेशद्वारावर ‘ठिय्या’ देत तिथेच शाळा भरविली. दरम्यान, एका विद्यार्थिनीची प्रकृती बिघडल्याने अघोषित आंदोलन चिघळले. यानंतर ‘सीईओ मॅडम’ खाली उतरल्या आणि त्यांनी ‘ आंदोलकांशी’ चर्चा सुरू केल्यावर तणाव काहीसा निवळला.
हेही वाचा >>> रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे: रायपूर – नागपूर रेल्वेमार्गावर १८ तासांचा ब्लॉक; अनेक गाड्या रद्द, प्रवाशांना त्रास
शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये शिक्षकांची निम्मे पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याचबरोबर बेंच, डेस्क, कुंपण, स्वच्छता गृह आदी भौतिक सुविधा उपलब्ध नाही. यास संदर्भात वेळोवेळी निवेदने दिली. सुमारे आठ दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेत शाळा भरविणार असे स्मरणपत्र ही दिले. मात्र, याची नेहमीप्रमाणे दखल घेण्यात आली नाही. यामुळे आज बुधवारी आक्रमक भूमिका घेत संतप्त तीनशे विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदवर धडक दिली. कार्यालयाच्या मुख्यप्रवेश द्वारात राष्ट्रगीत घेऊन आपली शाळा भरवली. मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी खाली येऊन आमचे गाऱ्हाणे ऐकावे व मागण्यांवर कारवाई कारवाई करावी एवढीच, माफक अपेक्षा शाळा भरविणाऱ्या विध्यार्थ्याची होती. मात्र, आपल्या कक्षात असूनही ‘ मॅडम’ लवकर खाली आल्या नाही. यामुळे ‘ आंदोलक’ संतापले. दरम्यान, एका विद्यार्थ्यानीची प्रकृती बिघडली. यामुळे प्रकृती बिघडलेल्या विद्यार्थिनीला उचलून घेत काही विद्यार्थ्यांचा ताफा सीईंओच्या कक्षाकडे निघाला. पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला न जुमानता विद्यार्थी कक्षात दाखल झाले. यानंतर कुठे ‘ मॅडम’ नी खाली येत चर्चा सुरू केली. हे वृत्त लिहिपर्यंत ही चर्चा सुरू होती.