लोकसत्ता टीम
अकोला : देशांतर्गत कृषी क्षेत्रामध्ये बदलत्या परिस्थितीचे मोठे आव्हान आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठे आपल्या सर्वोत्कृष्ट उपलब्धींव्दारे शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी मोलाचे योगदान देतात. कृषी विद्यापीठांना संशोधित पीक वाणांचे स्वामित्वधन मिळाल्यास त्यांच्या आर्थिक स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरणार आहे, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.
राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या ५२ व्या बैठकीचे उद्घाटन सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य आमदार रणधीर सावरकर, विधान परिषद सदस्य ॲड.किरण सरनाईक, राज्याचे फलोत्पादन संचालक कैलास मोते, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय भावे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.इंद्रमणी मिश्रा आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
आणखी वाचा-रामटेकच्या पराभवावरून महायुतीत महाभारत, तुमानेंकडून भाजप लक्ष्य
विद्यापीठातील संशोधन क्षेत्राला वन्य प्राण्यांमुळे होत असलेल्या उपद्रवाचा मुद्दा उपस्थित करून संपूर्ण संशोधन प्रक्षेत्रावर संरक्षित कुंपणाची निर्मिती करणे काळाची गरज असल्याचे नमूद करीत डॉ. शरद गडाख पुढे म्हणाले, बीजोत्पादनासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी विद्यापीठांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनुदानाची गरज असते. कृषी विद्यापीठांना संशोधित पीक वाणांचे स्वामित्वधन मिळाल्यास त्याचा लाभ होऊ शकतो. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे प्रसारित करण्यात आलेल्या मुख्य पिकांच्या सहा सुधारित वाण व एका यंत्रामुळे सुमारे २१ हजार कोटींचा महसूल प्राप्त झाला.
कुलगुरू प्रशांत पाटील यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाद्वारे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर अपेक्षित ध्येय साध्य करण्यासाठी संशोधनाची दिशा बदलावी लागेल. भविष्यात कृषी क्षेत्रासमोरील आव्हानांचा समर्थपणे सामना करावा लागण्याची गरज व्यक्त केली. कुलगुरू डॉ. इंद्रमणी यांनी राज्यातील कृषी विद्यापीठांच्या संशोधनात्मक मॉडेलचे देशपातळीवर अनुकरण करणे आवश्यक असल्याचे सांगून शेतीमध्ये कमी पाणी, खत व कमी खर्चात अपेक्षित उत्पादन देणाऱ्या विविध पिकांच्या जाती विकसित करण्यावर भर दिला जात असल्याचे म्हणाले.
आणखी वाचा-गडचिरोली : नक्षल्यांचा आणखी एक तळ उध्वस्त; मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त
कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी संबोधनांमध्ये गतकाळात झालेले कृषी संशोधन व भविष्यातील गरजेनुरूप संशोधनाची दिशा ठरवणे आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी, तर आभार डॉ. हरिहर कौसडीकर यांनी मानले.
उत्कृष्ट संशोधकांचा गौरव
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक संशोधन डॉ. हरिहर कौसडीकर यांनी मागील वर्षातील उत्कृष्ट संशोधन पुरस्कार विजेत्यांची नावे घोषित केली. त्यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कृषी अभियांत्रिकी विभागाचे संशोधक डॉ. बकाने, महात्मा फुले कृषी विद्यापीठातील डॉ. वाघ, डॉ. बाळासाहेब कोंकण कृषी विद्यापीठातील डॉ. विष्णू सावर्डेकर, मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. मेहेत्रे व डॉ. स्मिता सोळंकी यांना पुरस्कृत करण्यात आले.