लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमरावती : जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात अकराशे हून अधिक बांगलादेशी व रोहिंग्या मुस्लिमांना बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्रे दिल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीची दखल घेत अमरावती जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी समिती गठित केली आहे. दरम्यान, किरीट सोमय्या यांनी सोमवारी अंजनगाव सुर्जी येथे भेट देऊन या संपूर्ण प्रकरणाची चिरफाड होणार असल्याचे सांगितले. ज्या बांगलादेशी, रोहिग्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म दाखले मिळवले, त्यांना बसमध्ये बसवून परत पाठवले जाणार, असे ते म्हणाले.

किरीट सोमय्या म्हणाले, महाराष्ट्रात बांगलादेशवरून २२०० कोटी रुपये आले होते. त्यापैकी ३१९ कोटी रुपये बांगलादेशी आणि रोहिंग्यांना जन्माच्या दाखल्यासाठी खर्च करण्यात आले आहेत. अंजनगाव सुर्जीमध्ये अकराशे रोहिंग्या, बांगलादेशींना बनावट जन्म दाखले देण्यात आल्याची माहिती समोर आली. हा गंभीर प्रकार कार्यकर्त्यांनी लक्षात आणू दिल्याचा दावा देखील किरीट सोमय्या यांनी केला. अंजनगाव सुर्जी साठ हजार लोकसंख्येची नगरपरिषद असून, या ठिकाणी २० हजार मुस्लिम आहेत. १४०० लोकांचे जन्म दाखल्यासाठी अर्ज आले आहेत. यात जन्माचे दाखले ९८ टक्के बांगलादेशींचे आहेत. निवडणूक आचार संहिता काळात हा प्रकार झाला. त्यामुळे प्रत्येकाची चौकशी होणे गरजेचे आहे.

आणखी वाचा-गडचिरोली : धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार…

किरीट सोमय्या म्हणाले, या ठिकाणी ज्यांचा जन्म झाला, त्यांना जन्माचे दाखले देण्यास मुळीच हरकत नाही. पण, ज्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रमाणपत्रे मिळवली, त्याची फेरतपासणी होणे आवश्यक आहे. आपल्या तक्रारीनंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यांसोबत देखील आपण चर्चा केली. जन्माचे दाखले वितरित करताना राज्यातील इतर भागांमध्ये कशा प्रकारच्या त्रुटी दिसून आल्या, याची माहिती आपण त्यांना दिली.

जन्माचे दाखले वितरित करताना रेशन कार्डचा पुरावा देण्यात आला आहे, पण हे रेशन कार्ड खरे आहे का, याची तपासणी होणे गरजेचे आहे. तहसील कार्यालयाकडे याचा तपास करण्याची यंत्रणा नाही, आता इतर तपास यंत्रणांना यासंदर्भात काम करावे लागणार आहे. या यंत्रणा विशेष समितीला मदत करणार आणि कागदपत्रे खरी आहेत का, हे तपासले जाणार. अवैध राहणाऱ्या बांगलादेशी, रोहिंग्यांना परत जावे लागणार, असे सोमय्या म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 319 crores received for birth certificates of bangladeshis and rohingye says kirit somaiya mma 73 mrj