लोकसत्ता टीम
वर्धा : अमली पदार्थाच्या दुनियेत अत्यंत महागडे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मॅफेड्रॉन म्हणजेच एमडी या पदार्थाची नागपुरातून हिंगणघाटमार्गे वर्ध्यात होणारी तस्करी उघडकीस आली आहे.
आणखी वाचा-‘स्क्रब टायफस’चा धोका वाढला, यवतमाळमध्ये १० रुग्ण…
आरोपी सचिन मिशरकर हा नागपुरातून एमडी या मादक पदार्थाची वाहतूक करीत असल्याची खबर गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी हिंगणघाट येथील मनसे चौकात फिल्डिंग लावली. त्यावेळी भरधाव वेगात येणारी पांढऱ्या रंगाची कार दिसली. थांबवून झडती घेतल्यावर एका प्लास्टिक डबीत ७ ग्रॅम ८७० मिग्रॅ एमडी पावडर आढळून आली. त्याची अंदाजित किंमत ३१ हजार ५०० रुपये आहे. पोलिसांनी पावडर, रोख, कारसह पाच लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. यापूर्वी देखील असे अमली पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई झाली असल्याने हे शहर मादक पदार्थ विक्रीचा अड्डा होत चालल्याची चर्चा होते. पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या चमूने ही कारवाई केली.