चंद्रपूर : ३३ केव्ही एटापल्ली उपकेंद्रातून निघणाऱ्या ३३ केव्ही जांबिया गट्टा वीज वाहिनीवर साप चढला. विजेच्या धक्क्याने या सापाचा तर मृत्यू झाला. मात्र त्यामुळे ५० रोहित्रांचा वीजपुरवठा ख्ंडीत झाला व आसपासची ३३ गावे अंधारात गेली. यामुळे १ हजार ८८५ ग्राहकांचा वीजपुरवठाही खंडित झाला.
वरिष्ठ तंत्रज्ञांनी पोलवर चढून मृत अवस्थेत असलेला साप काढून घेतला तसेच हेडरी गावापुढे या वीज वाहिनीच्या तारा तुटलेल्या होत्या ते जोडण्यासाठी संबंधित वरिष्ठ तंत्रज्ञ आणि विद्युत सहाय्यक गेले आणि दुपारी एक वाजता वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. साप मृत का असेना भितीसोबत वीजखांबावर चढणे धोकादायकच असते. या पार्श्वभूमीवर लाईनमॅनने केलेल्या कामाची प्रशंसा होत आहे.
हेही वाचा – भंडारा: पाय घसरल्याने शेततळ्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू
नुकतेच वाघाच्या पंजाचे निशानही आढळले होते. तर चार पाच दिवसांपूर्वी धानोरा उपकेंद्रात हत्ती शिरले होते. महावितरणचे कर्मचारी अभियंते रात्रीअपरात्री, उन, वारा, पावसात काम करून प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करीत असतात. वीजदुरुस्तीची कामे करताना विदयुत अपघाताचा धोका तर असतो, परंतु अनेक परिस्थिती अशाही उद्भवतात की जेथे शारीरिक इजा व प्रसंगी जिवावर बेतते.
हेही वाचा – ‘सामान बेचो’ आंदोलन करीत हाताला काम नसलेल्यांनी केला निषेध
रानटी पशू, साप, विंचूसारखे सरपटणारे तर कधी रानडुक्कर, वाघ, बिबटे अशा प्राण्यांच्या व आता हत्तींच्या भितीतही काम करून वीजपुरवठा पूर्ववत करावा लागतो. त्याच प्राण्यांमुळे एकीकडे वीजपुरवठा खंडीत होऊन अंधार झाल्याने ग्रामस्थांना धोका असतो, तर नेमके त्याचवेळी त्याच प्राण्यांमुळे वीजदुरुस्ती करणाऱ्या महावितरणच्या अभियंता व जनमित्रांना धोका असतो. परंतु वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे कर्तव्य जनमित्र व अभियंते पार पाडत असतात.