नागपूर : मध्य नागपुरातील डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात (डागा) १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२३ या सात महिन्यांत ३४ बालके गर्भातच दगावली तर १८ नवजातांचा जन्मानंतर महिनाभरातच मृत्यू झाला. माहितीच्या अधिकारातून हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य भारतातील सर्वाधिक प्रसूती होणाऱ्या शासकीय रुग्णालयांपैकी डागा हे एक आहे. येथे १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२३ दरम्यान ३ हजार ४८४ मुले तर ३ हजार २३४ मुलींचा जन्म झाला. यातील १८ बालकांचा जन्मानंतर १ ते २८ दिवसांच्या आत मृत्यू झाला. सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या तपशीलानुसार, डागामध्ये १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२३ दरम्यान झालेल्या एकूण प्रसूतीमध्ये २ हजार ८०४ सामान्य तर ३ हजार ९१० सिझरद्वारे झाल्या. येथे १ ते २८ दिवसांत दगावलेल्या नवजातांमध्ये १२ मुले आणि ६ मुली होत्या. डागा रुग्णालयात उपचाराला येणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. वरील काळात येथे बाह्यरुग्ण विभागात १ लाख ८ हजार ३५४ तर २० हजार ३०६ रुग्णांनी दाखल होऊन उपचार घेतले.

हेही वाचा – नागपूर : अनैतिक संबंधातून जन्मलेले बाळ रस्त्यावर फेकले

मुलांचा जन्मदर अधिक

डागा रुग्णालयात १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ मध्ये १ हजार १९८ मुले तर १ हजार ६४ मुली जन्मल्या. १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ दरम्यान येथे ६ हजार २० मुले आणि ५ हजार ७१३ मुली जन्मल्या. १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ दरम्यान येथे ६ हजार २६३ मुले आणि ५ हजार ८२६ मुली जन्मल्या.

हेही वाचा – कुटुंबातील उमेदवारांना समान गुण! तलाठी भरती प्रकरण; सरकार तपास करत नसल्याचा आरोप

“डागा रुग्णालयात डॉक्टर-कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे येथे माता मृत्यू शून्य ठेवण्यात यश आले आहे. परंतु काही प्रसूती गुंतागुंतीच्या होत्या. त्यामुळे डॉक्टरांनी प्रयत्न केल्यावरही काही बालकांचा गर्भातच तर काहींचा १ ते २८ दिवसांच्या आत मृत्यू झाला. येथे चांगले उपचार मिळत असल्याने बाह्य आणि आंतरुग्ण वाढत आहेत.” – डॉ. सीमा पारवेकर, वैद्यकीय अधीक्षक, डागा.