नागपूर : वीजनिर्मिती आणि उद्योगधंद्यासाठी कोळसा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. कोळसा वाहतूक बहुतांशवेळा रेल्वेने केली जाते. औष्णिक वीज केंद्रांना पावसाळ्यापूर्वी कोळसा पुरवठा करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले असून रेल्वेने एका महिन्यातील (एप्रिल) कोळसा वाहतुकीतून ३४७.३० कोटींची कमाई केली आहे.
रेल्वेने या महिन्यात ८५६ मालगाड्यांनी (रेक) कोळसा पुरवठा केला. त्यातून रेल्वेला ३४७.३० कोटींची कमाई झाली. एका वाघिणी (वॅगन) मध्ये सरासरी ६५ टन माल भरला जातो. बंद वॅगनमध्ये नेल्या जाणाऱ्या मालाच्या बाबतीत मालगाडीचा (रेक)चा आकार अंदाजे २ हजार ६०० टन असतो आणि खुल्या वॅगनमध्ये वाहून नेल्या जाणाऱ्या मालाच्या बाबतीत अंदाजे ३ हजार ८०० टन असतो. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने कोळशाशिवाय इतर वस्तूंची मालवाहतूक एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणावर केली. यामध्ये लोहखनिज, सिमेंटचा समावेश आहे. लोहखनिज ४२ रेकने वाहतूक केले, परिणामी या मालवाहतुकीतून २८.५६ कोटी उत्पन्न झाले. सिमेंटने भरलेल्या ५४ रेक पाठवण्यात आल्या. त्यातून १६.७२ कोटींचे उत्पन्न झाले. तसेच कंटेनरचे ८२ रेक भरून पाठवण्यात आले आणि त्यामुळे रेल्वेला १२.५९ कोटींचे उत्पन्न मिळाले. याशिवाय मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने खानपान सेवेतून एप्रिल महिन्यात ११.५३ लाख रुपयांची कमाई केली. वणी आणि किरतगढ स्थानकांवरील केटरिंग स्टॉल्ससाठी ७.१० लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले.
हेही वाचा – ‘पाल्यांच्या कोवळ्या मनातील सुप्त प्रश्नांची उत्तरे पालकांनीच शोधावी’
हेही वाचा – नागपूर : महापालिकेकडूनच अतिक्रमणाचा ‘छुपा’ परवाना? खाद्यापदार्थ विक्रेते जुमानेना
रेल्वे तिकीट व्यतिरिक्त मिळणाऱ्या उत्पन्नात देखील वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये ३०.०८ लाख रुपये कमाई झाली. मागील वर्षी या महिन्यात १४.१७ लाख उत्पन्न झाले होते. रेल्वेस्थानक परिसरातील वाहनतळातून ३७.६९ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे, असे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी सांगितले.