यवतमाळ : जिल्ह्यातील विविध आदिवासी शासकीय आश्रमशाळांमधील ३५ विद्यार्थ्यांनी फर्ग्युसन कॉलेज पुणे, अझीम प्रेमजी विद्यापीठ भोपाळ, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स ॲण्ड इकॉनॉमिक्स पुणे आणि निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क मुंबई यांसारख्या प्रतिष्ठित महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकलव्य फाउंडेशन आणि आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने संयुक्तपणे राबविलेल्या पथदर्शी प्रकल्पामुळे जिल्ह्यातील आदिवासी समाजातील मुलांना पहिल्यांदाच उच्च शिक्षणासाठी उंच झेप घेता आली.

हेही वाचा – शेतकऱ्यांसाठी खुशखबर! लोह, जस्त व प्रथिनेयुक्त ज्वारी पीक वाण विकसित, अकोला कृषी विद्यापीठातील संशोधन

जिल्ह्यातील आदिवासीबहुल पोड, पाड्या, वस्त्यांवर अद्यापही शिक्षणाच्या सुविधा पोहोचल्या नाहीत. तरीही एकलव्य आणि आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून झालेल्या मार्गदर्शनामुळे आदिवासी मुलांनी उच्च शिक्षणाचा आदर्श जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसमोर ठेवला आहे.

शिक्षणाच्या पुरेशा सोयीसुविधा नसल्यामुळे आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना आश्रमशाळांत शिक्षण घेण्याशिवाय पर्याय नाही. प्रतिकूल परिस्थितीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांना एकलव्य फाउंडेशन व पांढरकवडा येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या पथदर्शी प्रकल्पामुळे देशातील विविध नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्याचा मार्ग गवसला आहे. या यशस्वी ३५ विद्यार्थ्यांसह आणखीही काही विद्यार्थ्यांना दिल्ली विद्यापीठ आणि जेएनयू व इतर केंद्रीय विद्यापीठांच्या निकालांची प्रतीक्षा आहे.

विशेष म्हणजे हे सर्व विद्यार्थी गोंड, आंध, परधान, माना आणि आदिम जमाती कोलाम समुदायासारख्या उपेक्षित आदिवासी गटांतील आहेत. ते त्यांच्या कुटुंबातील पहिल्या पिढीतील आणि आश्रमशाळांच्या इतिहासातील प्रतिष्ठीत विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेणारे पहिले विद्यार्थी ठरले आहेत.

हेही वाचा – ‘तरुण पोरगा कुंवारा अन् बापाचे लग्न दुबारा’, निवृत्त शिक्षक नियुक्तीचे संतप्त पडसाद

एकलव्य फाउंडेशन व आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने यवतमाळमधील १८ आदिवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळांसोबत राबवलेल्या प्रकल्पाचा अहवाल नुकताच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना सादर करण्यात आला. या प्रकल्पात एकलव्य फाउंडेशनने आदिवासी विद्यार्थ्यांना सर्वोच्च शिक्षण संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी तयार करण्यासाठी निवासी करिअर गायडन्स आणि मेन्टॉरिंग ब्रिज कोर्सद्वारे ५० विद्यार्थ्यांसोबत काम केले. या प्रकल्पासाठी प्रशांत चव्हाण, आकाश मोडक, कोमल गोरडे यांनी पुढाकार घेतला. जिल्हाधिकारी अमोल येडगे, आदिवासी विकास विभाग पांढरकवडा येथील प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन व एकलव्य फाउंडेशनचे प्रा. राजू केंद्रे यांच्यामुळे ३५ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित संस्थांमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे. प्रशासनाची अशीच साथ मिळाल्यास आगामी काळात शिक्षणाचा हा यवतमाळ पॅटर्न राज्यात पोहोचेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

उपेक्षितांना ‘एकलव्य’मुळे उच्च शिक्षणाची संधी

एकलव्य फाउंडेशनची चळवळ सहा वर्षांपूर्वी यवतमाळातून सुरू झाली. या चळवळीला देश, विदेशात मान्यता मिळाली आहे. आतापर्यंत एक हजार विद्यार्थ्यांना देशातील ६० नामांकित विद्यापीठांत तर, ४० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या विद्यापीठांत प्रवेश मिळाला आहे. गडचिरोली, नंदूरबार यासह अन्य आदिवासी जिल्ह्यांत हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी प्रशासनाचे सहकार्य अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया एकलव्य फाउंडेशनचे संसथापक प्रा. राजू केंद्रे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 35 students from tribal ashram schools admitted to reputed institutes pilot initiative of tribal project office with eklavya nrp 78 ssb
Show comments