अकोला : जिल्ह्यात अंमली पदार्थ वाहतूक, विक्री व वापरासंदर्भात वर्षभरात तब्बल ३६ गुन्हे दाखल झाले आहेत. यासंदर्भात सर्वसंबंधित विभागांनी समन्वयाने काम करून कारवाई व त्यासोबतच जनजागृतीवरही भर देण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले.
केंद्र शासनातर्फे जिल्हास्तरीय ‘नार्को कोऑर्डिनेशन’ केंद्र समिती स्थापित करण्यात आली आहे. जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करी व वापरावर आळा घालण्यासाठी ही समिती काम करते. या समितीची बैठक जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात घेण्यात आली.
हेही वाचा >>> पुन्हा भिर्रर्र..! वर्धा जिल्ह्यात बैलगाडा शर्यती रंगणार
जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री व सेवनास आळा घालण्यासाठी जनजागृतीवर भर देण्यात यावा. जिल्ह्यात रासायनिक पदार्थ निर्मिती कारखान्यांमध्ये अंमली वा प्रतिबंधित पदार्थांची निर्मिती होत असेल तर त्याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करून अहवाल सादर करावा, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात गेल्या वर्षभरात अंमली पदार्थ संदर्भात जानेवारी ते डिसेंबर २०२२ अखेर गांजाबाबत ३५ गुन्हे दाखल झाले. त्यात ३७ जणांना अटक झाली. आतापर्यंत २४३ किलो ३९४ ग्रॅम मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याची किंमत १८ लाख १४ हजार ६० रुपये आहे. अफू प्रकरणी एक गुन्हा दाखल असून दोघांना अटक झाली आहे. आतापर्यंत ८९० ग्रॅम मुद्देमाल जप्त असून त्याची किंमत ८ हजार रुपये आहे. २०२३ मध्ये २५ फेब्रुवारीअखेर गांजा प्रकरणी एक गुन्हा दाखल असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. जप्त मुद्देमाल ५ किलो ९८० ग्रॅम असून त्याची किंमत ५९ हजार ८०० रुपये असल्याची माहिती देण्यात आली.
हेही वाचा >>> चौथी-पाचवीतील बालमित्र धरणात पोहायला गेले अन्…
उपाययोजनांचे निर्देश अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तींवर वैद्यकीय उपचार व समुपदेशन करून त्यांना या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देशही बैठकीमध्ये देण्यात आले.