लोकसत्ता टीम
भंडारा : विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या इयत्ता अकरावीच्या तब्बल ३६ विद्यार्थ्यांना आज परीक्षेच्या पहिल्याच दिवशी परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आल्याचा संतापजनक आणि धक्कादायक प्रकार भंडारा येथील जिल्हा परिषद जकातदार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत समोर आला आहे.
विद्यालयाचे वार्षिक शुल्क भरले नाही त्यामुळे शिक्षकांचा पगार करता येत नाही असे कारण पुढे करत या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देण्यात आलेले नाही. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असून शिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापकाना कारणे दाखवा नोटीस बजावला आहे.
स्थानिक जकातदार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत कला आणि विज्ञान या दोन शाखा आहेत. कला शाखेला ग्रँट मिळाली असून विज्ञान शाखेला अद्याप ग्रँट नाही. त्यामुळं येथे शिक्षण घेणाऱ्या ६० विद्यार्थ्यांकडून अकरावी आणि बारावी अशा दोन वर्गाचे एकूण १० हजार रुपये शाळा शुल्क घेतले जाते. दरम्यान, काही विद्यार्थ्यांनी शुल्क भरले नाही. तर काही विद्यार्थ्यांनी पाच हजार रुपये शाळा शुल्क भरलेले आहे.
असे असतानाही शाळेतील ३६ विद्यार्थ्यांनी शाळा शुल्क न भरल्याच्या कारणावरून आज विज्ञान शाखेच्या मराठी विषयाच्या पहिल्या पेपराला सदर विद्यार्थ्यांना बसू न देता शाळेतून आल्यापावली परत पाठविण्यात आले. या ३६ विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या अधिक आहे. मुलांच्या शाळा शुल्कामधून त्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांचे वेतन केले जाते आणि विद्यार्थ्यांकडून शुल्क न आल्याने शिक्षकांचे वेतन थांबल्याची बाब पुढे करून मुख्याध्यापक हटवार यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवले असे सांगण्यात येत आहे.
मुळात मुलींना मोफत शिक्षण देण्यात यावे असे शासनाचे धोरण असताना केवळ शुल्क भरले नसल्याच्या कारणावरून परीक्षेला बसू दिले नाही त्यामुळे पालकवर्गत संताप व्यक्त होत आहे. याची दखल घेत जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी तातडीने शाळेला भेट देत मुख्याध्यापक हटवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
विद्यार्थ्यांनी शुल्क भरले नाही. त्यामुळे शिक्षकांचे तीन महिन्यापासून पगार झाले नाही. विद्यार्थ्यांनी शुल्क भरणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना धाक दाखविण्यासाठी असे केले. उद्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले जाणार आहे. -हटवार, प्राचार्य, जकातदार विद्यालय भंडारा.