शहरातील विविध रुग्णालयांत ४२ मृत्यू
नागपूर : उपराजधानीतील विविध रुग्णालयांमध्ये १ जानेवारी २०१९ ते आजपर्यंत ‘स्वाईन फ्लू’चे ३६६ रुग्ण आढळले असून पैकी उपचारादरम्यान ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. या महिन्यात पाचहून जास्त रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाचे धाबे दणाणले असून शासकीय रुग्णालयांत आवश्यक औषधांचा साठा असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
उपराजधानीच्या विविध रुग्णालयांमध्ये नुकतेच स्क्रब टायफसचे पाच रुग्ण आढळले असतानाच सप्टेंबर महिन्याच्या सोळा दिवसांत येथे स्वाईन फ्लूचेही पाचहून अधिक रुग्ण आढळले आहेत. थंड वातावरणात स्वाईन फ्लूचे संक्रमण झपाटय़ाने होते. रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींमध्ये हा आजार पसरण्याची जोखीम जास्त असते. त्यामुळे रुग्ण आढळताच महापालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. आढळलेल्या रुग्णांत विदर्भाच्या विविध भागातील काही रुग्णांचा समावेश असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्व शासकीय रुग्णालयांना दक्ष राहण्यास सांगितले आहे. सर्वत्र आवश्यक औषधे उपलब्ध ठेवण्याच्या सूचना असून रुग्ण आढळताच वरिष्ठांना सूचना करण्याचे आदेश आहेत. व्हेंटिलेटरची गरज असलेल्या रुग्णांना वेळीच जवळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवून त्यांना उपचार उपलब्ध करण्यात येणार आहे. महापालिकेतील एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या ३६६ झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे, तर महापालिकेच्या सर्व रुग्णालयांसह सार्वजनिक ठिकाणी स्वाईन फ्लू आजारावर जनजागृतीही केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.