नागपूर: सरकारी वीज कंपन्यांतील कंत्राटी वीज कामगारांचा सेवेदरम्यान अपघात वा इतर कारणांनी मृत्यू झाल्यास पूर्वी एकही रुपयाची मदत मिळत नव्हती. परंतु, आता ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना ४ लाखांची मदत मिळणार आहे.
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ व अन्य संघटनांकडून सातत्याने ही मागणी केली जात होती. या मुद्यावर ८ जानेवारीला मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात फडणवीस आणि विविध संघटनांची बैठक झाली.
हेही वाचा… रेल्वेगाड्या थांबल्या, विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची उचलबांगडी; नेमकं कारण काय? जाणून घ्या…
महानिर्मिती कंपनीला सामाजिक दायित्व निधीचा नियम लागू आहे. त्यामुळे या कंपनीतील कंत्राटी कर्मचारी दगावल्यास त्याच्या कुटुंबीयांना या निधीतून २ लाखांची मदत दिली जात होती. परंतु त्यातही काही नियमांच्या अडचणी होत्या. परंतु महावितरण व महापारेषणकडून मात्र एकही रुपयाची मदत मिळत नव्हती. ही बाब लक्षात घेऊन फडणवीस यांनी प्रधान ऊर्जा सचिव आभा शुक्ला आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना मदतीबाबत सूचना केली. त्यानंतर काही दिवसांतच अधिसूचना निघाली.
वर्षाला सुमारे २० कामगारांचा मृत्यू
राज्यात महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांमध्ये ४२ हजारांच्या जवळपास कंत्राटी कामगार आहेत. त्यापैकी सेवेदरम्यान अपघातासह इतर कारणांनी वर्षाला १५ ते २० कर्मचाऱ्यांचा मृत्यू होतो.
“सेवेदरम्यान दगावणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना ४ लाखांच्या मदतीचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केले. इतरही आश्वासन ते लवकरच पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे.” – नीलेश खरात, राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ.